राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होऊन संघाने दुसऱ्या शतकात पदार्पण केल्याच्या निमित्ताने आज देशाची राजधानी दिल्लीत ऐतिहासिक, शिस्तबद्ध आणि भव्य शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त उत्तर-पश्चिम दिल्लीतील रोहिणी सेक्टर २३ येथील समरसता स्थळावर ‘राष्ट्र वंदनम्’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना संबोधित केले आणि संघाच्या दुसऱ्या शतकातील वाटचालीचा आराखडा मांडला.
भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सकाळी ११ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी पूर्ण गणवेशात ८५ हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. तसेच समाजातील सुमारे ७५ हजार प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थिती लावली. अशा प्रकारे या भव्य सोहळ्यात एकूण १ लाख ६० हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते.
दिल्ली प्रांतात संघाचा विस्तार; ५६५ नव्या शाखांची सुरुवात
संघाच्या शताब्दी वर्षात दिल्ली प्रांतातील संघटनात्मक कार्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. या कालावधीत ५६५ नव्या शाखा सुरू करण्यात आल्या असून, गृहसंपर्क अभियानाच्या माध्यमातून २२ लाख कुटुंबांपर्यंत संघाचे कार्यकर्ते पोहोचले आहेत. दिल्ली प्रांतात सध्या एकूण २,३२२ शाखा कार्यरत असल्याची माहिती कार्यक्रमापूर्वी जाहीर करण्यात आली.
शताब्दी वर्षादरम्यान दिल्लीमध्ये संघाच्या वतीने एकूण २,९५८ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संघटनात्मक विस्तार, सामाजिक संपर्क आणि समाजातील विविध घटकांशी संवाद वाढवण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये दिल्लीतील १,७०५ वस्त्यांमध्ये हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात आले, तर ११० मंडळांमध्ये सामाजिक समरसता बैठका घेण्यात आल्या.
याशिवाय प्रमुख युवा संगम उपक्रमांतर्गत १८४ कार्यक्रम, युवकांशी संवाद साधण्यासाठी २३४ कार्यक्रम, महाविद्यालयांमध्ये २४५ पूर्वतयारी कार्यक्रम आणि युवक कुंभ तसेच युवा कुंभ उपक्रमांतर्गत १२५ मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
हे ही वाचा:
झारखंडमध्ये भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू
लग्नसराई – सणासुदीच्या खरेदीमुळे महागाईचा धोका वाढणार
उत्तर प्रदेशचे विभाजन न करताच विधानसभेतील जागा वाढणार
शताब्दी वर्षातील भव्य सोहळ्यासाठी विशेष तयारी
समरसता स्थळावर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमाची तयारी २१ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली होती. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण आणि अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात जनजागृती करण्याचे संकल्प करण्यात आले.
कार्यक्रमस्थळी सुमारे २ लाख ४० हजार चौरस मीटर परिसरात तंबूंचे भव्य शहर उभारण्यात आले होते. येथे १,२०० कार्यकर्त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्वयंसेवक आणि समाजातील नागरिकांसह एकूण १ लाख ९२ हजार जणांनी ‘अविरल’ ॲपच्या माध्यमातून नोंदणी केली होती.
कार्यक्रमाच्या तयारीसाठी संघाच्या ३८ विविध व्यवस्थात्मक गटांनी काम केले. शारीरिक प्रात्यक्षिकांमध्ये सुमारे ७० हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते, तर संघाच्या घोष पथकातील ८०० वादकांनी आपले सादरीकरण केले. कार्यक्रमस्थळी १०१ फूट उंचीच्या ध्वजही उभारण्यात आला होता.
समाजाच्या सहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा भाग म्हणून संघाने तीन प्रमुख संकल्प हाती घेतले आहेत. कचरामुक्त व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहभागातून १९ वस्त्यांमध्ये एरोबिक बिन्स आणि कंपोस्ट निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याच्या अभियानांतर्गत आतापर्यंत युवकांसह १५ हजार लोकांपर्यंत संपर्क साधण्यात आला आहे. येत्या काळातही हे अभियान सुरू राहणार आहे.
पर्यावरण संवर्धनालाही विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. ५० हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली आहे. विशेषतः सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या रोपांचे संरक्षण आणि संगोपन करण्यावर भर देण्यात येत आहे.
भारतीय सांस्कृतिक वारसा, ज्ञान, विज्ञान आणि कला यांचे दर्शन घडविणारे विशेष प्रदर्शनही या कार्यक्रमात आयोजित करण्यात आले होते. विशेषतः नव्या पिढीला भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि सभ्यताविषयक वारशाची ओळख करून देण्यावर या प्रदर्शनात भर देण्यात आला.
