मुंबई शहराला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण शहरात धडक विशेष मोहीम राबवली. या दोन दिवसीय कारवाईदरम्यान अंमली पदार्थ तस्करांविरोधात ७२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल १५ कोटी ८७ लाख रुपयांचे अमली पदार्थ आणि ९.४७ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या मोहिमेत फरार आरोपी आणि अजामीनपात्र वॉरंट बजावून एकूण ६१ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
३० जुलै रोजी सुरू झालेले “ड्रग फ्री मुंबई” अभियान आणि केंद्र शासनाच्या “नशामुक्त भारत अभियाना”च्या अनुषंगाने ही व्यापक कारवाई करण्यात आली. स्थानिक पोलीस ठाणी, अंमली पदार्थविरोधी विशेष कक्ष (ANC) आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी एकत्रितपणे ही मोहीम राबवली.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी
कोमलचा कांस्यवेध; अमृता सुवर्णपदकाच्या उंबरठ्यावर!
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
गोल्ड ईटीएफमधील मोठ्या गुंतवणुकीला ब्रेक
पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान गांजा, मेफेड्रोन (एमडी), हेरॉईन/ब्राऊन शुगर, चरस, एलएसडी पेपर, कोकेन, हशिश आणि हायड्रोपोनिक गांजा असा एकूण ४६.१६ किलो अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय कोडीनमिश्रित कफ सिरपच्या ९,५४० बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. जुन्या गुन्ह्यांत हवा असणाऱ्या २१ फरार आरोपींना पकडण्यात आले, तर न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट बजावत ४० आरोपींना अटक करण्यात आली.
संघटित टोळी चालवून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ५ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (MCOCA) कारवाई करण्यात आली. याशिवाय एका सराईत गुन्हेगाराला ‘PIT-NDPS’ कायद्यांतर्गत नाशिक कारागृहात एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. (सन २०२६ मध्ये आतापर्यंत एकूण १४ जणांवर अशी स्थानबद्धतेची कारवाई झाली आहे.) अमली पदार्थ विक्रीशी संबंधित गुन्हेगारांची २० अनधिकृत घरे आणि १४५ अवैध पानटपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
जनजागृती आणि नागरिकांना आवाहन
केवळ दंडात्मक कारवाईवर न थांबता पोलिसांनी शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक उत्सवांच्या ठिकाणी तब्बल ९,०३१ जनजागृतीपर कार्यक्रम घेतले असून, यात १.८३ लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. अमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भात काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी राष्ट्रीय अमली पदार्थ हेल्पलाईन (MANAS) १९३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
