मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये एका तरुणीची छेड काढून तिने विरोध केल्याने तिला नायगाव रेल्वे स्थानकात रुळांवर ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेत तरुणीचा डावा हात रेल्वेच्या चाकाखाली आल्याने कोपरापासून कापावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, लोकल नायगाव स्थानकात पोहोचल्यानंतर आरोपीने तिच्या छातीजवळ हात लावून गैरवर्तन केले. तिने विरोध करत आरोपीला चप्पल मारली. त्यानंतर दोघांमध्ये वाद आणि शिवीगाळ झाली. लोकल फलाटावर थांबलेली असताना आरोपीने तिला जोरात धक्का दिला. त्यामुळे ती दोन डब्यांच्या मधून रुळांवर पडली. ती फलाटावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच लोकल सुरू झाल्याने तिचा डावा हात चाकाखाली आला. या अपघातात तिच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली असून १६ टाके पडले आहेत.
हे ही वाचा:
किश्तवाडमध्ये ड्युटीवरून बेपत्ता झालेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची हत्या
कुलगाम हल्ल्यापूर्वीच सीआरपीएफ जवानांना मिळाला होता इशारा?
लाभार्थी हिंदू, ताबा बांगलादेशींकडे? म्हाडाच्या ११० घरांवरून वाद
ईशान्य भारतातील कर्तृत्ववानांचा होणार गौरव
घटनेनंतर आरोपी गर्दीचा फायदा घेऊन फरार झाला होता. ६ नोव्हेंबर रोजी भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११७(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, खुनाच्या प्रयत्नाचे कलम १०९ न लावल्याने पीडितेच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडित तरुणीनेही केली आहे.
