कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय, सुख-सुविधांनी भरलेले आयुष्य आणि समाजात प्रतिष्ठा असतानाही राजस्थानमधील एका कुटुंबाने सांसारिक जीवनाचा त्याग करून आध्यात्मिक मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. उदयपूर जिल्ह्यातील दिलीप भाई भोगर (४७), त्यांची पत्नी ज्योती बेन (४५) आणि दोन मुली छवी (२२) व चार्वी (१४) हे चौघे जैन दीक्षा घेणार आहेत. विशेष म्हणजे, या कुटुंबाने गुजरातमधील सूरत येथे वर्षाला सुमारे १५ कोटी रुपयांची उलाढाल असलेला कापड व्यवसाय उभा केला होता. येत्या ८ फेब्रुवारी २०२७ रोजी सूरतमधील पाल येथे ते दीक्षा स्वीकारणार आहेत.
दिलीप भाई भोगर हे मूळचे राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील जसवंतगढ गावचे रहिवासी आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने ते सूरतला गेले होते. सुरुवातीला एका छोट्या दुकानातून कापड विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. पुढे दोन दुकाने सुरू केली आणि अनेक यंत्रसामग्रीही उभारली. अशा प्रकारे त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल १५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.
या कुटुंबाच्या आध्यात्मिक प्रवासाला २०२३ मध्ये महत्त्वाचे वळण मिळाले. दिलीप भाई यांची मोठी मुलगी शैली हिने त्याच वर्षी जैन दीक्षा घेतली. सध्या ती साध्वी दर्शिता या नावाने ओळखली जाते. मुलीच्या दीक्षेनंतर दिलीप भाई यांनी व्यवसायाचा विस्तार करण्याऐवजी तो हळूहळू कमी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी स्वतः दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. पत्नी ज्योती बेन आणि अन्य दोन मुलींनीही त्यांच्या या निर्णयाला साथ दिली.
हे ही वाचा:
जागतिक नेत्यांना मोदींकडून भारतीय कलांचा नजराणा
रशियाचे लष्करी विमान कोसळून १९ जणांचा मृत्यू
सीआरपीएफ चौकीवरील हल्ल्यातील संशयित लष्कर कमांडर लतीफ भट ठार
ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला २७ वर्षांची शिक्षा
दीक्षेपूर्वी घेतले कठोर प्रशिक्षण
जैन दीक्षा स्वीकारण्यापूर्वी या चौघांनी जैन साधू-साध्वींसोबत राहून त्यांच्या जीवनशैलीचा अनुभव घेतला. पायी प्रवास करणे, आहार-विहाराचे नियम पाळणे आणि दैनंदिन धार्मिक आचारांचे पालन करणे याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. दीक्षेनंतरचे कठोर जीवन अंगीकारण्यासाठी त्यांनी स्वतःला तयार केले आहे. सध्या हे कुटुंब आपल्या मूळ गावी आले असून, त्यांच्या निर्णयामुळे गावात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
