घरसंपादकीयबटवारा १९४७ वर तारासिंगचा हॅण्डपम्प कोसळला...

बटवारा १९४७ वर तारासिंगचा हॅण्डपम्प कोसळला…

अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘बटवारा १९४७’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. अभिनेत्री शबाना आझमी यांची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका होती, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना हा चित्रपट अपयशी ठरल्याचे दु:ख झाले. परंतु, त्याहीपेक्षा जास्त दु:ख त्यांना या गोष्टीचे झाले की प्रेक्षकांनी सनी देओल यांना एका मुस्लिम व्यक्तीच्या भूमिकेत स्वीकारले नाही. प्रेक्षकांनी सनी देओलचा ‘बटवारा’ नाकारला; पण याच सनी देओलचा ‘गदर’ हा चित्रपट प्रेक्षकांनी हॅण्डपम्पसह डोक्यावर घेतला होता. ‘गदर’मधल्या तारासिंगचा हॅण्डपम्प अंगावर कोसळल्यासारखा ‘बटवारा १९४७’ कोसळला आहे. हिंदी सिनेसृष्टीतील काही लोकांना ७० च्या दशकातील तेच जुने चाटण प्रेक्षकांना चाटवायचे आहे, मात्र प्रेक्षक ते स्वीकारायला तयार नाहीत. हीच शबाना यांची व्यथा आहे.

‘लाहोर नई वेख्या, ओ जम्या इ नई’ या असगर वजाहत यांच्या नाटकावर आधारित हा चित्रपट आहे. हे नाटक गंगा-जमनी संस्कृतीचा उदोउदो करणारे आहे. म्हणजेच सगळे धर्म सारखे, ‘इन्सानियत’ हाच खरा धर्म असा डोस पाजून हिंदूंना कायम धर्मनिरपेक्षतेच्या गुंगीमध्ये ठेवण्याचा हा प्रयत्न वाटतो. या चित्रपटाची निर्मिती आमीर खान प्रॉडक्शनने केलेली आहे. आमीर खानसुद्धा तेच जुने विचार नव्या पॅकिंगमध्ये विकणारा अभिनेता-निर्माता आहे. ‘पीके’ चित्रपटात हिंदू देवतांची यथेच्छ टवाळी केल्यानंतर आमीर खान हिंदुत्ववाद्यांच्या रडारवर आला. हाच आमीर खान मक्केला गेला, तिथे अगदी शैतानाला दगड मारण्यापासून सर्व रितीरिवाज त्याने भक्तीभावाने पाळले. स्वतःच्या धर्मातील अनिष्ट रूढींबाबत डोळ्यांवर कातडे ओढून बसायचे, परंतु हिंदूंच्या देवतांना मात्र टिंगलीचा विषय बनवायचा, हा यांचा खरा चेहरा आहे. आमीर खान निर्माता असल्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘मंदीर तोडना इस्लाम नही’, ‘कोई मजहब बुरा नही होता, अच्छा बुरा आदमी होता है…’ असे खंडीभर संवाद आहेत, जे कदाचित मूळ नाटकामध्येही असावेत. ट्रेलरमध्ये हे दोन संवाद ऐकूनच बऱ्याच लोकांनी चित्रपट पाहणे टाळले असावे.

 

हिंदी सिनेमा गेल्या काही वर्षांत बाळबोधपणाकडून वास्तवाच्या दिशेने प्रवास करत आहे. लोकांच्या मेंदूवर ‘धुरंधर’सारख्या चित्रपटांचा प्रभाव ताजा असताना लोक तेच एक्स्पायरी डेट संपलेले जुने विचार कशाला स्वीकारतील? चित्रपटात कालानुरूप काही बदल होणे अपेक्षित असते. कधीकाळी चित्रपटात मारहाण सुरू असताना ‘ढीशूम, ढीशूम’ असे आवाज काढले जात. आज कोणत्याही चित्रपटात तुम्हाला हे पाहायला मिळते का? हीच बाब कथानकाबाबतही सांगता येईल. सुभाष घई यांचा ‘कर्मा’ हा सुपरहिट चित्रपट १९८६ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या डॉ. डेंग या पात्रावर बेतलेला होता. आज जर काश्मीरमधील दहशतवाद एखाद्या ‘डॉ. डेंग’मुळे होतो आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला, तर हा चित्रपट चालेल का? तिथे तुम्हाला दाढी-टोपीवाले कट्टर जिहादीच दाखवावे लागतात. लोक चित्रपट तेव्हाच डोक्यावर घेतात, जेव्हा त्यात जे काही मांडले आहे ते प्रेक्षकांना पटते आणि भावते. बांगलादेश व पाकिस्तानात मंदिरे जाळली जात आहेत, मूर्ती खंडित केल्या जात आहेत; हिंदुस्तानात जिथे मुस्लिमबहुल वस्त्या आहेत, तिथेही हीच परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत ‘मंदीर तोडना इस्लाम नही’ असा संदेश जर तुम्ही लोकांना द्यायला जाल, तर कोण असा चित्रपट पाहायला येईल?

हे ही वाचा:

मैसूर एक्सप्रेस’ जवागल श्रीनाथ!

कोलकाता बिलबोर्ड वादात अभिषेक बॅनर्जींना पोलिसांचे समन्स

‘कॉक्रोच’ नेत्यांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा

जिओ प्लॅटफॉर्म्सचा विक्रमी आयपीओ

 

फाळणीनंतर पाकिस्तानात परिवारासह आलेल्या एका मुस्लिम तरुणाला एक घर दिले जाते. तिथे राहणाऱ्या एका वृद्ध हिंदू महिलेसाठी तो आजूबाजूच्या तमाम मुस्लिमांशी पंगा घेतो, असे हे कथानक आहे. शबाना आझमी यांनी या हिंदू महिलेची भूमिका साकारली आहे. लोकांनी केवळ मुस्लिम भूमिका साकारणारा सनी देओल नाकारला नाही, तर हिंदू स्त्री साकारणाऱ्या शबाना आझमी यांनाही नाकारले आहे. वैयक्तिक जीवनात त्या घनघोर हिंदूविरोधी आहेत; त्यांचा स्पष्टवक्तेपणा फक्त हिंदूंपुरता मर्यादित असतो. काही वर्षांपूर्वी बरखा दत्त यांच्या एका कार्यक्रमात दिल्लीतील जामा मशिदीचे इमाम सय्यद अहमद बुखारी यांची मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीत प्रेक्षकांमध्ये शबाना आझमीदेखील उपस्थित होत्या. त्यांनी बुखारींना एक प्रश्न विचारला. प्रश्नाचे उत्तर न देता बुखारी म्हणाले, “मै नाचने-गानेवाली तवाइफो के सवाल का जवाब नही देना चाहता.”

मुस्लिमांच्या सर्वोच्च धर्मगुरूने एका मुस्लिम महिलेचा जाहीरपणे अपमान केला होता, परंतु यांची काय बिशाद की त्या इस्लामच्या विरोधात एकही शब्द बोलतील! समलैंगिक स्त्रियांवर आधारित ‘फायर’ चित्रपटातील पात्रांची नावे ‘सीता’ आणि ‘राधा’ अशी ठेवण्यात आली. यावर जेव्हा गदारोळ निर्माण झाला, तेव्हा शबाना यांनी निर्लज्जपणे त्याचे समर्थन केले होते. राधा आणि सीतेऐवजी पात्रांची नावे शबाना आणि सायरा ठेवा अशी मागणी संतप्त प्रेक्षकांनी केली, तेव्हा “हा चित्रपट पितृसत्ताक भारतीय (हिंदू) समाजातील पिचलेल्या महिलांवर आधारित असल्यामुळे तसे करता येणार नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली.

मुस्लिम समाजात मौलांनांची सोय करून देणाऱ्या ‘हलाला’सारख्या प्रथांचा सुळसुळाट असताना शबाना यांच्या तोंडून कधी ब्र बाहेर पडला नाही. ट्रिपल तलाक किंवा बुरख्याला त्यांनी कधी विरोध केला नाही. अशा महिलेला हिंदू म्हणून प्रेक्षक स्वीकारतील तरी कसे?

फाळणीनंतर ज्या पाकिस्तानातून हिंदूंच्या प्रेतांनी भरलेल्या ट्रेन्स भारतात यायच्या, त्या पाकिस्तानात एक असहाय हिंदू स्त्री सुरक्षित राहिली असेल, हा विचार तरी पटण्यासारखा आहे का? अशा भाकडकथा लोकांच्या गळी उतरवणे शक्य नाही, कारण त्यांना आता हिंदी सिनेमाचे सत्य समजले आहे. कधीकाळी अमिताभ बच्चन यांनी ‘कुली’मध्ये मुस्लिम नायक रंगवला. त्यांच्याच ‘दिवार’ चित्रपटात ते हिंदू असताना त्यांच्या दंडावर लावलेला ‘७८६’ चा बॅच प्रेक्षकांनी स्वीकारला; परंतु आज प्रेक्षक सनी देओलला मुस्लिम भूमिकेत स्वीकारायला तयार नाहीत, ही शबाना यांची खंत आहे. याचे कारण एकच—लोक आता सूज्ञ झाले आहेत. जावेद अख्तर यांनीही हीच खंत अनेकदा बोलून दाखवली. त्यांच्या ‘दिवार’ चित्रपटातील नायक मंदिरात जात नाही, परंतु हाताला बांधलेला ‘७८६’ चा बिल्ला मात्र मिरवतो. “असे सिनेमे मी आज बनवू शकत नाही,” अशी कबुली त्यांनी दिली होती. प्रेक्षक आता अज्ञानी राहिलेला नाही; हिंदी सिनेसृष्टीतील काही लोकांचे चेहरे त्यांच्यासमोर उघडे पडले आहेत.

आज तुम्ही चित्रपटामध्ये प्रेमळ मौलानाही दाखवू शकत नाही, कारण हे सगळे कट्टर असतात हे लोकांना कळले आहे. ‘गदर’ चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा शबाना यांचे तोंड आंबट झाले होते; हा चित्रपट चिथावणीखोर असल्याची टीका त्यांनी केली होती. तेव्हा सनी देओलसोबत त्यांची शाब्दिक खडाजंगीही झाली होती आणि सनीने शबाना यांना चांगलेच सुनावले होते.

‘बटवारा’ पडल्यानंतर शबाना म्हणाल्या की, “असे वातावरण बनवले जात आहे की प्रेक्षकांमध्ये दोन तट पडले आहेत. हिंदुस्तान आणि पाकिस्तान हा विषय तुम्ही हिंदी चित्रपटात दाखवू शकत नाही.” ‘बटवारा’ चित्रपटात दिलेला राजकीय संदेश कुठेही चुकीचा वाटत नाही, असा त्यांचा दावा आहे. मात्र हा दावा प्रेक्षकांना पटत नाही. शबाना यांचा स्वतःचा राजकीय अजेंडा आहे—जसा तो आमीर खान किंवा सैफ अली खान यांचा आहे. लोक या सगळ्यांना नाकारत आहेत, कारण त्यांचा अजेंडा आता उघड झाला आहे. कालपर्यंत तो झाकलेला होता. ही सगळी हिंदूविरोधी गँग आहे हे हिंदू प्रेक्षकांच्या लक्षात आल्यामुळे ते आता यांना महत्त्व देईनासे झाले आहेत. हा इशारा फक्त आमीर आणि शबाना यांना नाही, तर सनी देओलसारख्या कलाकारांनाही आहे. लोकांनी तारासिंग हॅण्डपम्प उखाडून मारतो ही फॅन्टसी स्वीकारली, ती “हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा…” अशा संवादांमुळे! तो सिकंदर मिर्झा झाला तरी प्रेक्षक पाहायला येतील, फक्त ‘मंदीर तोडना इस्लाम नही’ अशी दिशाभूल त्याच्याकडून अपेक्षित नाही. कारण हे ऐकताच लोकांना लगेच बाबरी, काशी विश्वनाथ आणि मथुरेतील कृष्णजन्मभूमीची आठवण येते. त्यामुळे सिनेसृष्टीने आपले ग्रामर सुधारावे, बाकी काही नको!

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version