दिशा सालियनचे संशयित मृत्यू प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाने अखेर सीबीआयकडे सोपवले आहे. तिचा मृत्यू सहा वर्षांपूर्वी झाला होता. सुनावणीदरम्यान या प्रकरणाबाबत अनेक प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले होते. हे प्रश्न नवे नाहीत. यापूर्वी अनेकांनी अनेक व्यासपीठांवर हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. हे प्रश्न गंभीर आहेत. आश्चर्य म्हणजे तपासकर्त्या पोलिसांना हे प्रश्न पडले नाहीत.
सहा वर्षांनंतर या प्रकरणाशी संबंधित किती पुरावे शिल्लक राहिले असतील, हा प्रश्नच आहे. सीबीआयकडे जादूचा दिवा आहे आणि त्यांच्याकडे सोपवलेल्या सर्व प्रकरणांचे तपास मार्गी लागतात, असा अनेकांचा गैरसमज आहे. दिशाप्रकरणात सीबीआयने तपास करावा असे काही मालवणी पोलिसांनी शिल्लक ठेवले असेल काय? की फक्त पुन्हा दिशाप्रकरणात तपासाची औपचारिकता पार पाडली जाणार आहे? हा सवाल अनेकांच्या मनात आहे.
सीबीआयकडे आरुषी तलवार, जिया खान, शीना बोरा अशी अनेक हत्याप्रकरणे सोपवण्यात आली. सीबीआयला हे गुंते सोडवता आले नाहीत; कारण ही प्रकरणे सीबीआयच्या हाती जाण्यापूर्वी एक तर बराच काळ वाया गेला होता आणि तोपर्यंत पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुरावे नष्ट झालेले होते. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल टॉवर लोकेशनसारखे डिजिटल पुरावे किंवा व्हिसेरा, टिश्यूसारखे जैविक पुरावे एका मर्यादित काळापर्यंत टिकवून ठेवता येतात. आरोपी धनदांडगे किंवा राजकीय क्षेत्राशी संबंधित असतील, तर प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना धमकावून किंवा लालूच देऊन फोडणे शक्य असते.
८ जून २०२० रोजी मालाड पश्चिमेतील ‘गॅलेक्सी एपेक्स’ या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडलेला दिशाचा मृतदेह सापडला. मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असावी. ती पडली होती की तिला जिवंतपणी अथवा ठार करून फेकण्यात आले होते, याचा शोध पोलिसांना घ्यायचा होता. मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. पाच वर्षांत पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. प्रकरण खणून काढण्याऐवजी ते दडपण्यात पोलिसांना जास्त रस होता, अशी लोकांची भावना होती; कारण या प्रकरणात सत्ताधारी राजकारण्यांपैकी एक बडे नाव होते. तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यापासून मालवणी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच राजकारण्यांचे घरगडी असल्यासारखे वागत होते.
हे ही वाचा:
प्रवेश नाकारल्यामुळे कूपर रुग्णालयात बुरखा घातलेल्या महिलेचा गोंधळ
अन्नसंकटामुळे बेजार पाकिस्तानात खाद्यपदार्थांच्या वापरात घट
तुर्कीच्या समुद्रात जहाजांच्या धडकेत एक जहाज बुडाले
आता नेपाळ म्हणतो, भारत, अमेरिका, चीनने नुकसानभरपाई द्यावी!
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी या प्रकरणी न्यायालयीन लढा सुरू केला. आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांनी आरोप केले. त्यांच्या कर्जतच्या फार्महाऊसमध्ये बराच गौडबंगाल सुरू असल्याचा आरोप केला. दिशाच्या प्रकरणाचा या फार्महाऊसशी काही संबंध असावा, असा संशय निर्माण करणारे सतीश सालियन यांचे आरोप होते.
आरोप महाराष्ट्रातील एका तालेवार ठाकरे घराण्यातील युवराजांच्या विरोधात होते; तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाचे, अर्थात आदित्यचे होते. त्यामुळे पोलिसांचा तपास निष्पक्ष असण्याची शक्यता कमीच होती. पोलिसांनी दाद दिली नाही, त्यामुळे सालियन यांना न्यायालयाचे दार ठोठवावे लागले. प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. न्या. सारंग कोतवाल आणि रणजीतसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली.
यादरम्यान अनेक महत्त्वाचे प्रश्न न्यायमूर्तींनी उपस्थित केले. १४ व्या मजल्यावरून पडून एखादा मृतदेह छिन्नविछिन्न झाला असता; मात्र दिशा सालियनच्या मृतदेहाची कवटी शाबूत राहिली. तिचा फक्त दात तुटला. चेहरा आणि केसालाही धक्का लागला नाही. इमारतीपासून दहा फुटांवर तिचा मृतदेह सापडावा, हेही ती गॅलरीतून पडली या माहितीपेक्षा विपरीत आहे. जिथे पडली तिथे रक्ताचे डाग आढळले नाहीत. तिचा देह विवस्त्र होता. दिशाचा तोल गेला असेल, ती नशेत पडली असेल किंवा तिने आत्महत्या केली असेल, यापैकी कोणतीही बाब गृहीत धरली तरी ती विवस्त्र का होती? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.
हे सगळे प्रश्न पडण्यासाठी फार तीक्ष्ण बुद्धिमत्ता असण्याचे कारण नाही. हे प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनातील होते. पोलिस मात्र त्याबाबत विचार करत नव्हते, ही बाब खटकणारी आहे. दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने आपल्या अशिलाला क्लीन चिट दिलेली आहे, असे प्रतिज्ञापत्र आदित्य ठाकरे यांच्या वकिलाने न्यायालयात सादर केले होते. तेसुद्धा खोटे ठरले; कारण सीबीआयने या प्रकरणात चौकशीच केली नव्हती. आदित्य ठाकरेंना अशी खोटी बतावणी करावी लागली, हा प्रकार संशयास्पद आहे. क्लीन चिटचे ढोल वाजवणारे आदित्य ठाकरे नेमकी कोणाची दिशाभूल करत होते?
अपघाती मृत्यूची शक्यता वाटत होती, तर पोलिसांचा तपास पाच वर्षे का रेंगाळला? सामूहिक बलात्कार आणि हत्येची तक्रार दिशाच्या वडिलांनी करूनसुद्धा पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल उपस्थित करत न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
वकील नीलेश ओझा यांनी दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या बाजूने युक्तिवाद केला. विपरीत परिस्थितीत हा खटला लढवला आणि आदित्य ठाकरे यांचे वस्त्रहरण केले, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. प्रकरण घडले तेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस आयुक्त परमबीर सिंह, वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि मालवणी पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला; या प्रकरणातील पुरावे नष्ट केले. इमारतीत येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद करणारे रजिस्टर, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन या महत्त्वाच्या पुराव्यांकडे साफ दुर्लक्ष केले. हे प्रकरण दाबण्यात येत आहे.
ॲड. नीलेश ओझा सुरुवातीपासून या प्रकरणाशी आदित्य ठाकरे, सूरज पंचोली आणि दिनो मोरिया यांचे नाव जोडत आहेत. ८ जून रोजीचे त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन न्यायालयात सादर करण्याची मागणी करत आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये केंद्रीय दूरसंचार विभागाने मोबाईल कंपन्यांना ग्राहकांचा मोबाईल टॉवर लोकेशनसंबंधी तपशील जपून ठेवण्याचा कालावधी एका वर्षावरून दोन वर्षांपर्यंत वाढवला होता. हा नियम गृहीत धरला तरी दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणाला ५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. या काळात मोबाईल टॉवर लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, इमारतीचे रजिस्टर हे सगळे पुरावे असतील की नष्ट केले असतील, याबाबत कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.
इमारतीच्या वॉचमनने त्या रात्री काहीही संशयास्पद झाले नसल्याचा जबाब नोंदवल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. हा वॉचमन दिशाच्या मृत्यूनंतर गायब झाला. इमारतीत ये-जा करणाऱ्या व्यक्तींची नोंद ज्या रजिस्टरमध्ये केली जात होती, त्यातील काही पाने फाडण्यात आली असल्याचे निदर्शनास आले.
दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणांत फक्त सहा दिवसांचे अंतर आहे. दिशाचा मृत्यू ८ जूनचा आणि सुशांतचा मृत्यू १४ जूनचा. दोन्ही प्रकरणांत फक्त सहा दिवसांचे अंतर; हा योगायोग असण्याची शक्यता कमी आहे. या दोन्ही प्रकरणांत काहीतरी समान सूत्र आहे. कदाचित या दोघांना काहीतरी असे समजले होते, ज्यामुळे त्यांना संपवणे काही लोकांसाठी आवश्यक बनले होते.
दिशा प्रकरण आरुषी तलवार किंवा जिया खानच्या वाटेने जाऊ नये, अशी जनतेची इच्छा आहे. ज्या प्रकरणात धनदांडगे आणि राजकीय नेत्यांची नावे असतात, त्या प्रकरणात न्याय होण्याची शक्यता कमी आणि सौदेबाजी होण्याची शक्यता जास्त असते; जनतेचा तरी आजवरचा हाच अनुभव आहे. दिशा आणि सुशांतचे प्रकरण त्या वाटेने जाण्याची शक्यता जास्त आहे.
पाच वर्षांनंतर हे प्रकरण आता पूर्णपणे प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवर अवलंबून आहे. त्यात पोस्टमोॉर्टम करणारे डॉक्टर आणि कर्मचारी, इमारतीचा वॉचमन आणि बाकीचे रहिवासी—म्हणजेच रात्री चुकून-माकून जे काही घडले ते ज्यांच्या नजरेस पडले असे लोक समाविष्ट आहेत. त्यांना बोलते करणे सोपे नाही. प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती असते, प्रत्येकाला जीव प्यारा असतो. जर दिशा आणि सुशांतची हत्या झाली असेल आणि आरोपींचे पुढची पाच-सहा वर्षे काहीच वाकडे झाले नसेल, तर ‘आपली अगरबत्ती कुठे लागणार?’ असा विचार जर साक्षीदारांनी केला तर मात्र या प्रकरणाचे काही खरे नाही.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
