तुर्कीतील मारमारा समुद्रात दोन तुर्की ध्वजधारी व्यापारी जहाजांची भीषण टक्कर झाली. या अपघातानंतर एका मालवाहू जहाजाशी संपर्क तुटला असून, जहाजावरील सर्व १० खलाशी बेपत्ता आहेत. जहाज समुद्रात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, बेपत्ता खलाशांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही दुर्घटना बुधवारी पहाटे सुमारे ३ वाजता इस्तंबूलजवळील सिलिव्ह्री किनारपट्टीपासून समुद्रात घडली. तुर्की ध्वजधारी ‘टुगबर्क इमामोग्लू’ हे मालवाहू जहाज आणि ‘अल्सू’ नावाच्या तेल किंवा रासायनिक टँकरची एकमेकांवर धडक झाली.
अपघातानंतर ‘टुगबर्क इमामोग्लू’ या जहाजाकडून आपत्कालीन संदेश प्राप्त झाला होता. मात्र, त्यानंतर जहाजाशी संपर्क होऊ शकला नाही. काही वेळातच जहाज बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या जहाजावर कॅप्टनसह एकूण १० खलाशी होते. तुर्कीच्या वाहतूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, टक्कर झाल्यानंतर अवघ्या ११ मिनिटांत मालवाहू जहाज बुडाले असावे. समुद्रात लाइफबोट आणि जहाजाचे काही अवशेष सापडले असले तरी अद्याप एकाही खलाशाचा शोध लागलेला नाही.
हे ही वाचा:
५.५ टन औषधांसह बचाव पथक घेऊन पाचवे विमान नेपाळकडे रवाना
होर्मुझवर अमेरिकेचे जवळपास पूर्ण नियंत्रण!
अरे बापरे !! अमित ठाकरे थेट मोदींना भिडले
पाकिस्तानची कोती मनोवृत्ती, मोदींचा फोटोच हटवला!
बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या शोधासाठी दोन हेलिकॉप्टर आणि १२ बचाव नौका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. तटरक्षक दलाकडून समुद्रात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, दुसऱ्या जहाजाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, तुर्की प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू केला आहे. मारमारा समुद्र हा तुर्कीच्या महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असून, या मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यापारी जहाजांची वाहतूक होते. त्यामुळे या भीषण अपघातानंतर सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
