घरसंपादकीयनौदलाला मिळाले स्टेल्थ कवच; चिन्यांचा चडफडाट

नौदलाला मिळाले स्टेल्थ कवच; चिन्यांचा चडफडाट

जपानच्या पंतप्रधान साने ताकाईचि भारत भेटीवर आल्या होत्या. भारत-जपान दरम्यानच्या १६ व्या वार्षिक शिखर परिषदेत दोन्ही देशांमध्ये आर्थिक, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण करार आणि सामंजस्य करार करण्यात आले. भारत आणि जपानमध्ये झालेली ही भागीदारी चीनसाठी मोठा झटका मानली जात आहे. जपान हा नाटो गटातील देश आहे, परंतु गेल्या काही वर्षांत अशा काही घडामोडी घडल्या आहेत की, अमेरिका आणि युरोपातील देशांपेक्षा जपानला भारत अधिक विश्वासू भागीदार वाटतो आहे.

जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. जपानच्या पंतप्रधान साने ताकाईचि यांनी “आबे हे माझ्या थोरल्या भावासारखे होते,” असे विधान केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आबे हे तुमच्या मोठ्या भावासारखे असतील तर तुम्ही माझ्या लहान बहिणीसारख्या आहात.” अर्थ स्पष्ट आहे, दोन्ही देशांमध्ये असलेल्या संबंधांवर भूराजकीय घडामोडींचा प्रभाव असला तरी त्यात आत्मीयतेचे व विश्वासाचे नाते आहे, जे देशांचे संबंध प्रदीर्घ काळ टिकण्यासाठी महत्त्वाचे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सनकीपणा आणि चीनचा विस्तारवाद यामुळे भारत-जपानचे संबंध अधिकच घट्ट झाले आहेत.

दोन देशांचे नेते भेटतात तेव्हा अनेक महत्त्वपूर्ण करार होत असतात, भारत आणि जपानमध्येही तसे करार झाले आहेत. रेअर अर्थ मिनरल्स आणि सेमीकंडक्टर पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी भारत आणि जपान एकत्रितपणे काम करणार आहेत. ‘क्रिटिकल मिनरल्स इन्फॉर्मेशन एक्स्चेंज’ आणि तंत्रज्ञान भागीदारीतून हे साध्य केले जाणार आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि जपानच्या ‘टोक्यो इलेक्ट्रॉनिक्स’ या दोन्ही देशांतील कंपन्या सेमीकंडक्टर पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी काम करणार आहेत. एआय क्षेत्रात जपानकडे असलेले तंत्रज्ञान आणि भारताची अफाट सॉफ्टवेअर क्षमता एकत्र आणून दोन्ही देशांनी सहकार्याचा रोडमॅप तयार केला आहे. अन्य बरेच करार झालेले आहेत, त्यात ‘युनिकॉर्न अँटेना’  हा असा प्रकल्प आहे, ज्यामुळे हिंद-प्रशांत क्षेत्रात भारत आणि जपानची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे.

हिंद-प्रशांत क्षेत्रात वाढलेल्या चीनच्या आक्रमकपणाला चेकमेट करणारा हा प्रकल्प आहे. भारत आणि जपानमधील हा पहिलाच संयुक्त लष्करी हार्डवेअर प्रकल्प आहे. यामुळे चीनच्या सागरी हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येऊ शकेल. दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्रात इतर देशांच्या सीमांमध्ये घुसखोरी करण्याचा चीनचा गेल्या काही वर्षांतील इतिहास आहे. दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रातील वाढत्या तणावावर ‘गंभीर चिंता’ व्यक्त केली आहे. कोणत्याही देशाने बळाचा वापर करून किंवा धमकावून आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे उल्लंघन करू नये, असे जाहीर करत दोन्ही देशांनी चीनच्या विस्तारवादी धोरणाचे कान उपटले आहेत.

या करारांमुळे बिथरलेल्या चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने विनाबिलंब “दोन देशांमधील सहकार्य हे कोणत्याही तिसऱ्या देशाला लक्ष्य करणारे किंवा प्रादेशिक शांततेत फूट पाडणारे नसावे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे; त्यावरून तीर व्यवस्थित निशाणावर लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘युनिकॉर्न’ ही नौदलाच्या युद्धनौकांसाठी विकसित केलेली एक ‘पॅसिव्ह आणि एकात्मिक सिग्नल मॅनेजमेंट सिस्टीम’ आहे. हा स्वतःहून हल्ला करणारा छुपा रोबोट किंवा लेझर शस्त्र नसून, शत्रूचे रडार आणि इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवणारी यंत्रणा निकामी करणारी एक प्रगत ‘स्टेल्थ’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक डिफेन्स’ प्रणाली आहे.

युद्धनौकांवर बसवले जाणारे हे अँटेना नौदलाला स्टेल्थ क्षमता देणारे आहेत. पारंपरिक युद्धनौकांवर वेगवेगळ्या दळणवळण यंत्रणांसाठी अनेक अँटेना बसवावे लागतात. ‘युनिकॉर्न’ प्रणाली या सर्व वेगवेगळ्या अँटेनांना एकत्र करून एकाच मुख्य खांबामध्ये (Mast) सामावून घेते. युद्धनौकेवर जास्त अँटेना असतील, तर ती जहाजे शत्रूच्या रडारवर सहज पकडली जातात. ‘युनिकॉर्न’चा आकार असा बनवला आहे, ज्यामुळे युद्धनौकेची ‘रडार सिग्नेचर’ लक्षणीयरीत्या कमी होते. म्हणजेच, भारतीय नौदलाची जहाजे चीनच्या रडारच्या नजरेत न येता गुपचूप समुद्रात हालचाली करू शकतील.

चीनने इलेक्ट्रॉनिक जॅमिंगच्या (सिग्नल ब्लॉक करणे) तंत्रात मोठी क्षमता विकसित केली आहे. ‘युनिकॉर्न’ ही अत्यंत प्रगत आणि जॅम-प्रूफ प्रणाली आहे. युद्धकाळात चीनने भारताचे दळणवळण तोडण्याचा प्रयत्न केला, तरी या अँटेनामुळे भारतीय नौदलाची जहाजे एकमेकांशी आणि जपानी नौदलाशी अखंड संपर्क टिकवून ठेवू शकतील.

या प्रणालीच्या मदतीने हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रातून जाणाऱ्या चीनच्या पाणबुड्या आणि युद्धनौकांवर अतिशय बारीक आणि अचूक लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. भारत आणि जपानमध्ये झालेला हा करार ऐतिहासिक आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने देशाच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे अमेरिकेचे कवच स्वीकारले. राज्यघटनेत केलेल्या बदलानुसार इतर देशांसोबत लष्करी तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत कठोर निर्बंध स्वीकारले. मात्र, चीनच्या वाढत्या धोक्यामुळे अलीकडे जपानने आपले धोरण बदलले आहे. जपानने भारताला आपला असा पहिला भागीदार निवडले आहे. भारतासोबत जपान आता संयुक्तपणे लष्करी हार्डवेअर विकसित करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जपानच्या साहाय्याने युनिकॉर्नची निर्मिती भारतातच होणार आहे. यामुळे भारतीय संरक्षण कंपन्यांना जपानच्या ‘प्रिसिजन इंजिनिअरिंग’चा थेट फायदा मिळेल.

युनिकॉर्नमुळे भारत आणि जपानच्या नौदलांमधील ‘इंटर-ऑपरेबिलिटी’ अर्थात संवाद, संपर्क आणि समन्वय वाढेल. संकटकाळात भारत आणि जपानची जहाजे एकाच दळणवळण प्रणालीचा वापर करून एकमेकांशी रिअल-टाइम डेटा आणि गुप्त माहिती शेअर करू शकतील.

चीन अनेकदा हिंदी महासागरात आणि श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात आपली ‘युआन वांग’ (Yuan Wang) सिरीजची सॅटेलाइट आणि मिसाइल ट्रॅकिंग जहाजे पाठवतो. ही जहाजे समुद्रात फिरून भारतीय युद्धनौकांचे रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल आणि रडार लहरी टिपण्याचे काम करतात. पारंपरिक युद्धनौकांवरून निघणाऱ्या वेगवेगळ्या लहरींमुळे चीन ही जहाजे सहज ट्रॅक करत असे. मात्र, ‘युनिकॉर्न’ सर्व फ्रिक्वेन्सी एकाच संरचनेत एकत्र करून ‘अल्ट्रा-लो रडार क्रॉस-सेक्शन’ तयार करतो. यामुळे चीनच्या या गुप्तहेर जहाजांना भारतीय युद्धनौकेचा अचूक ठावठिकाणा लावणे किंवा तिचे सिग्नल जॅम करणे अत्यंत कठीण होईल.

‘युनिकॉर्न’ अँटेनाच्या आकारामुळे चीनच्या अत्याधुनिक रडारमधून निघणाऱ्या लहरी भारतीय जहाजावर आदळल्या, तरी त्या परत चीनच्या जहाजाकडे न जाता विखुरल्या जातात. परिणामी, चीनच्या रडार स्क्रीनवर भारतीय युद्धनौका एखाद्या मोठ्या जहाजाऐवजी एका छोट्या मासेमारी करणाऱ्या बोटीसारखी दिसेल. युद्धकाळात चीन शत्रूच्या जहाजांचे संपर्क तोडण्यासाठी प्रगत हाय-पॉवर रेडिओ जॅमर्स वापरतो. ‘युनिकॉर्न’मध्ये बसवलेले जपानी ‘मल्टी-बँड’ आणि ‘फ्रीक्वेंसी-हॉपिंग’ तंत्रज्ञान चीनच्या जॅमिंग सिग्नलला भेदून थेट भारतीय किंवा जपानी मुख्यालायाशी संपर्क साधू शकते.

चीनकडे ‘याओगान’  सिरीजचे प्रगत लष्करी सॅटेलाइट्स आहेत, जे हिंदी महासागरावरून फिरताना भारताच्या जहाजांवर लक्ष ठेवतात. यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे सॅटेलाइट्स असतात; रडार इमेजिंग सॅटेलाइट (SAR सॅटेलाइट) हे सॅटेलाइट ढगांमधूनही समुद्रातील जहाजांचे फोटो काढू शकतात. ‘युनिकॉर्न’ युद्धनौकेच्या वरील भागाला  विशिष्ट आकार देतो, ज्यामुळे सॅटेलाइटच्या रडार लहरींना चकवा मिळतो आणि जहाजाची अचूक ओळख पटवणे चीनला कठीण जाते. समुद्रातील युद्धनौका जेव्हा आपल्या तळाशी संपर्क साधतात, तेव्हा सॅटेलाइट ते सिग्नल पकडून जहाजाचे लोकेशन शोधतात. ‘युनिकॉर्न’ हे सिग्नल अत्यंत अरुंद पट्ट्यात (Narrow Beam) थेट सॅटेलाइटकडे किंवा तळाकडे पाठवतो, ज्यामुळे चीनच्या पाळत ठेवणाऱ्या सॅटेलाइट्सना हे सिग्नल मध्येच पकडणे शक्य होत नाही. भारत-जपानच्या या हातमिळवणीमुळे चीनचा इतका तिळपापड होतो आहे, हे यावरून सहज लक्षात येऊ शकते.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version