घरक्राईमनामाएमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली? सहा जण अटकेत

एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली? सहा जण अटकेत

एमपीएससीचे सहायक विभाग अधिकारी, अवर सचिव सहभागी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक (गट-ब) पदासाठी झालेल्या चाळणी परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच मिळवून ती अनधिकृत व्यक्तींना वितरित केल्याच्या आरोपावरून मुंबई गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. २२ मार्च २०२६ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक (गट-ब) पदासाठी ही चाळणी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तज्ज्ञांकडून अत्यंत गोपनीय पद्धतीने तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपींनी परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मिळवून त्यांचा स्वतंत्र संच तयार केला आणि तो अनधिकृत व्यक्तींपर्यंत पोहोचवल्याचा आरोप आहे. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षेतील गोपनीयतेचा भंग झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलिस निरीक्षक मंगेश देसाई यांच्या तक्रारीवरून २५ ऑगस्ट रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत २६ ऑगस्ट रोजी सहा आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एमपीएससीचे सहायक विभाग अधिकारी विश्वेश्वर दत्तात्रय नकाते, अवर सचिव अभिजित गणपतराव लेंढवे आणि सहायक विभाग अधिकारी गोपाळ भट्टू मराठे यांचा समावेश आहे. याशिवाय नंदुरबार येथील कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण दिलीप पाटील, कथित सूत्रधार अमृत नामदेव पाटील आणि लोकेश ऊर्फ गौरव राजेंद्र पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

कार्यक्रम आरएसएसचा; मग ममदानीला का वांत्या?

मणिपूरमध्ये १३ उग्रवादी जेरबंद; शस्त्रसाठा जप्त

महाप्रलय! नेपाळमध्ये हाहाकार, १०५ भारतीय बेपत्ता

संदेशखालीतील ईडी हल्ला प्रकरणातील मिथू सरदारला अंड्यांचा प्रसाद

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस), महाराष्ट्र स्पर्धात्मक परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक कायदा, २०२४ तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक, विश्वासघात, गुन्हेगारी कट आणि लोकसेवकांशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपांचा यात समावेश आहे. अटक केलेल्या सहाही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सदानंद राणे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

प्रश्नपत्रिकेतील गोपनीय माहिती आरोपींपर्यंत नेमकी कशी पोहोचली, ती कोणाकोणाला वितरित करण्यात आली आणि या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपींवरील आरोप अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध झालेले नाहीत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version