पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या कथित हेरगिरीच्या जाळ्याचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने साहिल (२५) आणि त्याची पत्नी समीरा (२१) या दाम्पत्याला अटक केली आहे. हे दोघे २०२४ पासून पाकिस्तानस्थित गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या दाम्पत्याने भारताशी संबंधित संवेदनशील माहिती मिळवून देण्यासह भारतीय सिमकार्ड पाकिस्तानात पाठवल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, साहिल आणि समीरा यांनी २०२४ ते २०२५ या कालावधीत ८ भारतीय सिमकार्ड मिळवून ती दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवली. या सिमकार्डच्या बदल्यात त्यांना सुमारे ३० हजार रुपये देण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. ही सिमकार्ड पाकिस्तानात पोहोचल्यानंतर त्यांचा वापर करून व्हॉट्सअप खाती सुरू करण्यात आली. या खात्यांच्या माध्यमातून पाकिस्तानस्थित गुप्तचर अधिकाऱ्यांनी भारतातील व्यक्तींशी संपर्क साधला आणि संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. काही खात्यांद्वारे भारतीय व्हॉट्सअप समूहांमध्येही प्रवेश करण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, साहिलला भारतातील विविध लष्करी छावण्यांची पाहणी करून त्याबाबत माहिती गोळा करण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. तसेच हेरगिरी आणि प्रत्यक्ष कारवायांसाठी इतर व्यक्तींची भरती करण्याची जबाबदारीही त्याच्यावर असल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा:
कॅनडाला डिवचलं? ट्रम्प यांनी लेक ऑन्टारिओचं नाव केलं ‘लेक अमेरिका’
नेपाळमध्ये महापुराचं थैमान; मृतांचा आकडा ४६९ वर
नेपाळवर पुन्हा महापुराचे संकट; चीनचा गंभीर इशारा
दिल्लीतील सराय काले खान परिसरातून साहिलला अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईलची न्यायवैद्यक तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पाकिस्तानस्थित एजंट्ससोबतचे कथित संभाषण आढळल्यानंतर पोलिसांनी या जाळ्याचा पुढील तपास सुरू केला. पोलिसांच्या माहितीनुसार, २०२४ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून साहिलचा एका पाकिस्तानी एजंटशी संपर्क झाला. त्यानंतर या एजंटने त्याची ओळख पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्याशी करून दिली. आर्थिक लाभाचं आमिष दाखवून दाम्पत्याला या हेरगिरीच्या जाळ्यात सहभागी करून घेण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. साहिल आणि समीरा यांच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या मोबाईलमध्ये पाकिस्तानस्थित गुप्तचर अधिकाऱ्यांसोबतचे कथित संभाषण आणि भारतातील नेटवर्कशी संबंधित माहिती आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं.
