घरदेश दुनियाचिखल, पाण्याच्या महाकाय तडाख्याने तिबेट, नेपाळमध्ये हाहा:कार, ९५ मृत्युमुखी, १३३ भारतीय बेपत्ता

चिखल, पाण्याच्या महाकाय तडाख्याने तिबेट, नेपाळमध्ये हाहा:कार, ९५ मृत्युमुखी, १३३ भारतीय बेपत्ता

१६ जणांचा मृत्यू, ४०० जण बेपत्ता

नेपाळच्या तिबेट सीमेवरील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या अचानक महापुराने मोठी हानी झाली आहे. पुराच्या पाण्याने घरे, वाहने, पूल, रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्प वाहून गेले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ४०० जण बेपत्ता आहेत. यामध्ये १३३ भारतीय नागरिकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

तिबेटमध्ये झालेल्या भूकंपानंतर भूस्खलन झाले आणि त्यामुळे नेपाळमध्ये हा जलप्रपात पाहायला मिळाला. नेपाळमधील पाच जिल्ह्यांना या महापुराचा प्रचंड फटका बसला. सगळी घरे, वाहने, पूल हे या जलसागरात वाहून गेली. त्यामुळे नेमके किती मृत्युमुखी पडले याची अद्याप संपूर्ण माहिती हाती आलेली नाही.

या सगळ्या महाप्रलयाचे अनेक व्हीडिओ आता समोर येत असून तिबेटमध्ये तर एका इमारतीच्या वरून पाण्याचा महाप्रवाह आल्याच्या व्हीडिओने सगळ्यांनाच धक्का दिलेला आहे. त्यानंतर एका बंदरावरही पाण्याचा हा प्रवाह कोसळल्याचा व्हीडिओ स्तंभित करणारा आहे.

नेपाळच्या पूर अंदाज विभागानुसार, भोटे कोशी नदीत तिबेटच्या बाजूने अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा भयंकर मोठा प्रवाह आला. स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे ९ वाजता हा पाण्याचा लोंढा नदीत दाखल झाला. त्यानंतर रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि स्याप्रुबेसी परिसराला मोठा फटका बसला. या पुराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तिबेटच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचे उपग्रह छायाचित्रांमधून दिसून आले आहे. हिमनदीतील तलाव फुटल्याने पूर आला का, (जीएलओएफ) ही शक्यता देखील तपासली जात आहे. नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भूकंपामुळे हिमस्खलन होऊन त्यातून पुराचा लोंढा निर्माण झाल्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

पुराच्या तडाख्यात अनेक गावं आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचे ठिकाण वाहून गेल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. तिबेट सीमेवरील तिमुरे बाजार आणि जवळील सीमाशुल्क परिसराचे मोठे नुकसान झाले असून वाहने आणि माल पुराच्या पाण्यात वाहून गेला. रसुवागढी येथे गेल्या वर्षीच्या पुरानंतर पुन्हा बांधण्यात आलेला ‘फ्रेंडशिप ब्रिज’ही पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. तसेच तीन नेपाळ पोलीस सुविधा केंद्रांचे नुकसान झाले आहे. यामध्ये तिमुरे येथील क्षेत्र पोलीस कार्यालय, स्याप्रुबेसी येथील पोलीस चौकी आणि रसुवागढी येथील पोलीस चौकीचा समावेश आहे. पुरामुळे सुरक्षा यंत्रणेलाही मोठा फटका बसला आहे. तिमुरे परिसरात तैनात असलेले सशस्त्र पोलीस दलाचे नऊ जवान बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

या पुराचा परिणाम नेपाळच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरही झाला आहे. जलविद्युत प्रकल्पांसह रस्ते आणि पूलांचे नुकसान झाले असून सुमारे ४३० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता प्रभावित झाल्याचे नेपाळच्या ऊर्जा मंत्रालयाने सांगितले आहे. ही क्षमता देशाच्या एकूण स्थापित जलविद्युत क्षमतेच्या १२ टक्क्यांहून अधिक आहे.

हे ही वाचा:

भारत-फ्रान्स मिळून बनवणार ‘अरावली’ हेलिकॉप्टर इंजिन

बाब-अल-मंदेबवर भारतीय नौदलाची नजर; दोन जहाजांचा सुरक्षित प्रवास

मुदत संपलेले मासे, अस्वच्छ किचन; बंगळुरूतील हाय-प्रोफाइल क्लबमधील प्रकार

जगभरातील अमेरिकन व्हिसा अपॉइंटमेंट्सला स्थगिती

नेपाळ सरकारने पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरू केले आहे. नेपाळ पोलीस, लष्कर आणि सशस्त्र पोलीस दलाची पथके शोध आणि बचावकार्यात सहभागी झाली आहेत. दोन लष्करी हेलिकॉप्टरही प्रभावित भागाकडे पाठवण्यात आली. मात्र, स्याप्रुबेसी आणि तिमुरे येथे पाण्याची पातळी अत्यंत वाढल्याने हेलिकॉप्टर उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. नेपाळचे पंतप्रधान बलेन्द्र शाह यांनी आपत्कालीन बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भोटे कोशी आणि त्रिशूली नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तिबेटच्या काही भागाला तडाखा

नेपाळच्या सीमेपलीकडे चीनच्या तिबेटमधील ग्यिरोंग काउंटी आणि ग्यिरोंग बंदर परिसरालाही पुराचा फटका बसला आहे. भूस्खलनामुळे रस्ते, दळणवळण आणि वीजपुरवठा खंडित झाला असून या भागातही मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि बेपत्ता व्यक्तींची माहिती समोर आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आणि पूर्वसूचना यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत.

बिहारमध्येही सतर्कता

भोटे कोशी नदीचा प्रवाह पुढे त्रिशूली नदीच्या खोऱ्यात जात असल्याने नेपाळच्या पुराचा परिणाम पुढील भागांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुवाकोट, धादिंग, गोरखा आणि चितवन या भागांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नेपाळमधून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बिहारमध्येही सतर्कता वाढवण्यात आली आहे. बिहारमधील सहा जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षता घेण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याशी फोनवरून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकांची तयारी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version