आध्यात्मिक गुरु सद्गुरूंच्या कैलास यात्रेच्या एका गटातील ७७ भाविक तिबेटमधील ग्यिरोंग येथील स्थलांतर केंद्रात असताना अचानक आलेल्या भीषण पुराच्या तडाख्यात अडकले. कैलास यात्रेवरून परतताना हा गट स्थलांतर कार्यालयात थांबला होता. त्याचवेळी अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण इमारत आणि सीमावर्ती शहराचा मोठा भाग पाण्याखाली गेला.
सद्गुरूंनी समाजमाध्यमावरील एका संदेशातून सांगितले की, या केंद्रात असलेल्या भाविकांची सध्याची स्थिती किंवा ते नेमके कुठे आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. बचाव पथके परिस्थितीचा आढावा घेत असून, तिबेट-नेपाळ सीमेवर मोठ्या प्रमाणात पूर आणि भूस्खलन झाले आहे.
नेपाळच्या डोंगराळ रसुवा जिल्ह्यातही भीषण पूर आला असून आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक गावे आणि पायाभूत सुविधा प्रकल्प वाहून गेले आहेत. नेपाळ पर्यटन मंडळाच्या प्राथमिक माहितीनुसार, ३८४ जणांशी संपर्क होऊ शकलेला नाही, हे सर्व यात्रेकरू असल्याचे सांगण्यात आले.
भोटेकोशी नदीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस आणि लष्करासह बचाव व मदत पथके बाधित भागात रवाना करण्यात आली आहेत. सद्गुरूंनी सांगितले की, कैलास यात्रेतील २१ गटांपैकी ४९५ जण सुरक्षितपणे परतले आहेत. ७४३ जण सध्या तिबेटमध्ये, १४८ जण नेपाळमध्ये, तर ७७ जण स्थलांतर केंद्रात अडकले आहेत. याशिवाय तीन स्वयंसेवक नेपाळमधील तिमुरे येथे आहेत.
हे ही वाचा:
नेपाळच्या महापुरावर चीनकडे संशयाची सुई
फ्लोरिडात भीषण अपघात; तेलंगणातील ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू
पदक मिळेपर्यंत घरी जाणार नाही!
मणिपूरमध्ये १३ उग्रवादी जेरबंद; शस्त्रसाठा जप्त
सद्गुरूंनी म्हटले की, ग्यिरोंग येथे झालेला हा पूर अत्यंत भीषण आणि दुःखद आहे. भाविक परतीच्या प्रवासात स्थलांतर कार्यालयात असताना हा पूर आला आणि इमारतीसह शहराचा मोठा भाग पाण्याखाली गेला. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नेपाळच्या बाजूला भूस्खलन झाले. त्यामुळे ग्यिरोंग बंदर परिसरात जीवितहानी झाली असून अनेक जण बेपत्ता आहेत.
या दुर्घटनेनंतर चीनच्या बाजूने ग्यिरोंग बंदराकडे जाणारे रस्ते, दळणवळण व्यवस्था आणि वीजपुरवठाही खंडित झाला आहे. शोध आणि बचावकार्य सुरू असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.
नेपाळमध्ये स्याप्रुबेसी आणि तिमुरे हे भाग सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. भोटेकोशी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी बचाव आणि मदतकार्यांसाठी पोलीस तसेच लष्कराला बाधित भागात पाठवण्यात आल्याचे सांगितले.
सद्गुरूंनी सांगितले की, ते स्वतःही या परिसरात असून त्यांचे स्वयंसेवक आणि मदत पथके बाधितांना मदत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. त्यांनी या दुर्घटनेत प्रभावित झालेल्या भाविकांच्या कुटुंबीयांप्रती आणि इतर पीडितांप्रती सहवेदना व्यक्त केली.
