घरदेश दुनियाफ्लोरिडात भीषण अपघात; तेलंगणातील ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

फ्लोरिडात भीषण अपघात; तेलंगणातील ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात तेलंगणातील तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी हा अपघात ब्रेवर्ड काउंटीमधील इंटरस्टेट-९५ महामार्गावर झाला. तिघेही विद्यार्थी आपल्या पार्ट-टाईम कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी कारमधून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान कार नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्यालगतच्या झाडावर आदळली आणि या भीषण दुर्घटनेत तिघांचाही जीव गेला.

मृतांपैकी न राहुल हा तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील नविपेटचा रहिवासी होता. अपघाताच्या वेळी कारमधील चालक आणि पुढील सीटवर बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर राहुलला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. इतर दोन विद्यार्थ्यांची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
हे ही वाचा:
महाप्रलय! नेपाळमध्ये हाहाकार, १०५ भारतीय बेपत्ता

नेपाळच्या महापुरात १०५ भारतीय बेपत्ता

‘खेलो इंडिया डायलॉग’मध्ये पंतप्रधान मोदी साधणार तरुणांशी संवाद

यूएस ओपनमध्ये सेरेना-अल्काराज पराभूत; उपांत्य फेरीचे स्वप्न भंगले!

राहुल काही महिन्यांपूर्वीच उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. त्याने एमएसचे शिक्षण पूर्ण केले होते आणि पुढे पीएचडीसाठी साउथ फ्लोरिडा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला होता. त्याचबरोबर तो नोकरीच्या शोधातही होता. शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी अमेरिकेत गेलेल्या राहुलच्या कुटुंबावर या अचानक आलेल्या दुःखाने मोठा आघात झाला आहे.

राहुलचे वडील हरिबाबू यांनी आपल्या मुलाचा मृतदेह शक्य तितक्या लवकर भारतात आणून अंत्यसंस्कार करण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी विनंती केली आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी पहाटेच्या सुमारास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, अपघाताच्या काही वेळ आधीच राहुलने आईशी फोनवर संवाद साधला होता. मित्र त्याला घेण्यासाठी आले असल्याचे सांगून त्याने फोन ठेवला आणि तोच त्याचा कुटुंबीयांशी झालेला शेवटचा संवाद ठरला.

या दुर्घटनेनंतर अमेरिकेतील तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका फ्लोरिडा प्रशासनाच्या संपर्कात असून, मृतदेह भारतात आणण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या तीन तरुणांचे आयुष्य एका क्षणात संपल्याने तेलंगणातील त्यांच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version