कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू झालेल्या आंदोलनाचा अखेर पुरता बोजवारा उडाला. हे खरे तर होणारच होते. जंतर मंतरवर पहिल्यांदा नीट पेपर फुटीप्रकरणी आंदोलन झाले तेव्हा विषय महत्त्वाचा होता, जनतेशी, विद्यार्थ्यांशी संबंधित होता. पण त्यानंतर एकदम कॉक्रोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या विषयाला हात घातला, तेव्हापासून हे आंदोलन उतरणीला लागले. पुराणकथांमध्ये जसा भस्मासूर होता, तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवत असे त्याचे भस्म होत असे तसे आपण ज्याच्या डोक्यावर हात ठेवू त्याचा राजीनामा घेऊ असे कॉक्रोच जनता पार्टीला वाटू लागले. आम्हाला कोण अडवणार, मोदी—शहा यांच्यात काय ताकद आहे, आमच्या पाठीशी १४० कोटी जनता आहे, असा भ्रम कॉक्रोच जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांना झाला. मात्र आता त्यांचा बोरा बिस्तरा गुंडाळला गेला आहे. जोपर्यंत ते कायद्याच्या चौकटीत येत नाहीत तोपर्यंत त्यांना सगळी सूट मिळाली. कायद्याच्या कक्षेत आल्यानंतर मात्र आंदोलनातली सगळी हवा हळूहळू काढली गेली. सगळ्यांना वास्तवाचे भान करून देण्यात आले.
या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीसोबत पहिल्यापासून असलेली डाव्या विद्यार्थी संघटनेची नेता नेहा बोरा हिच्यावतीने न्यायालयात जे निवेदन केले गेले त्यातून तिने कॉक्रोच जनता पार्टीसोबत आपले काहीही देणेघणेच नाही, असा युक्तिवाद केला. अर्थात, हा युक्तिवाद निरर्थक होता. कारण तिचे प्रत्येक आंदोलन हे कॉक्रोच जनता पार्टीच्या सोबतच होते. एवढेच कशाला पत्रकार परिषदांत, आंदोलनस्थळी देखील ती कॉक्रोच जनता पार्टीसोबतच बसल्याचे आणि तिथे भाषणे ठोकल्याचे दिसले. दिल्लीतल्या कनॉट प्लेस येथे तिरंगा लहरा दो नावाचे आंदोलन करण्यासाठी ती तिथे गेली होती, तेव्हा तिला ताब्यात घेण्यात आले होते. आंदोलन करण्याची ती जागा नसतानाही तिथे आंदोलनाचा प्रयत्न करून त्या भागात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. त्यासंदर्भात तिच्याकडून बॉण्डही लिहून घेतला गेला.
या सगळ्या घडामोडीत हे स्पष्ट झाले की, आपला कॉक्रोच जनता पार्टीशी कोणताही संबंध नाही, असे म्हणण्याची वेळ नेहा बोरावर आली. प्रत्यक्ष आंदोलन सुरू असताना ती कशी वाघीण आहे, कशी नीडर आहे अशा शब्दांत कौतुक करत सोशल मीडियात तिला हिरो करण्याचा प्रयत्न होत होता. प्रत्यक्षात न्यायालयात तिने झुरळ झटकले. कॉक्रोचशी कुणालाही आता संबंध ठेवायचा नाही, याचेच हे निदर्शक म्हणावे लागेल. कारण आता कारवाई सुरू झाली आहे, तेव्हा आपण त्या गावचेच नाही, असा पवित्रा सगळेजण घेत आहेत. नेहा बोराने तर एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपण बांगलादेशाकडून रिजिम चेंजची प्रेरणा घेतलेली नसल्याचेच विधान केले. त्याआधी बांगलादेश हेच आपल्याला मिळालेल्या प्रेरणेचे केंद्र असल्याचे ती अभिमानाने सांगत होती.
याच आंदोलनात रिजिम चेंज म्हणजे तख्तापलट करण्याची भाषा वापरणारे प्रशांत भूषण यांची आंदोलनाची खुमखुमी अजूनही संपलेली नाही. पण आता त्यांना कॉक्रोचची साथ नाही. कॉक्रोचच्या सगळ्या नेत्यांना अशांतता पसरवणार नाही, असे बॉण्ड भरून दिलेले आहेत. तेव्हा प्रशांत भूषण यांनाच आता एकट्याने रिजिम चेंज करावा लागणार आहे. त्यांनी २३ ऑक्टोबरला आंदोलनाची हाक दिली होती. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सगळ्यांनी रस्त्यावर उतरा असे त्यांनी आवाहन केले होते. प्रत्यक्षात त्यांचे हे आंदोलन हिमाचल प्रदेशाच्या पलिकडे कुठे गेले नाही. तिथेही अवघे ५०-१०० लोक जमले असतील तेवढेच. प्रशांत भूषण यांच्या आवाहनावरून देशात आंदोलन होईल, अशी शक्यताही नाही. पण पेशाने वकील असलेल्या प्रशांत भूषण यांना दिल्लीत आंदोलन करता आले नाही. त्यांनाही दिल्लीपासून लांब राहावे लागले. कारण दिल्लीत आंदोलन करायचे आणि पोलिस कारवाईच्या जाळ्यात अलगद सापडायचे हे टाळण्यापलिकडे त्यांच्या हाती काहीही नाही. त्यापेक्षा हिमाचल प्रदेशात आंदोलन करून आपली हौस भागवून घेऊ असे त्यांना वाटले असावे.
हे आवाहन करताना त्यांनी देशातील जनतेला आवाहन केले की, आता लोकशाही वाचविण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल. देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात, गल्लीबोळात लोकांनी रस्त्यावर उतरावे असे आवाहन त्यांनी एका व्हीडिओच्या माध्यमातून केले. देशातील जनतेपर्यंत ते बहुतेक पोहोचले नसावे कारण कुठेही देशात असे आंदोलन झाले नाही. प्रशांत भूषण यांचे ऐकून देशातल्या प्रत्येक गल्लीबोळात लोक आंदोलन करतील याची अजिबातच शक्यता नाही.
कॉक्रोच जनता पार्टीचे जे दोन नेते न्यायालयीन कोठडीत होते, ते सौरव दास आणि आशुतोष रांका सध्या तरी आंदोलनाचा कोणताही विचार करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. शिवाय, त्यांचा नेता अभिजित दिपकेने दिवाळीपर्यंत कोणतेही आंदोलन होणार नाही, असे आवाहन केलेले असल्यामुळे सध्या कॉक्रोच जनता पार्टी दिवाळीच्या फराळनिर्मितीला हातभार लावतील अशीच शक्यता आहे. अभिजित दिपकेचा याआधी एक व्हीडिओ आला होता ज्यात आपण कोणत्याही कारवाईला घाबरत नाही, १०००वेळा जेल मध्ये टाका आपण मोदी शहांना घाबरत नाही, असे दिपके म्हणत असे. मात्र आता शांतता राखण्यासंदर्भात बॉण्ड भरून दिल्यावर त्याची भाषा बदलली.
जंतर मंतरवर आंदोलनाला परवानगी नसतानाही सौरव दास आणि आशुतोष रांका हे तिरंगा घेऊन जंतर मंतरमध्ये पोहोचले होते, त्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. पाच दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आल्यानंतर त्यांचा धीर खचला आहे. भगत सिंग यांचा फोटो लावणे सोपे आहे, पण त्याप्रमाणे वागणे मात्र अजिबातच सोपे नाही, याची जाणीव त्यांना झालेली आहे. त्यामुळे दोन दिवस न्यायालयीन कोठडी वाढविल्यानंतर न्यायालय कसे आपल्यावर अन्याय करत आहे, अशी अगतिकतेची भाषा या दोघांनी वापरली होती. तेवढेच कशाला, न्यायालयीन कोठडी दोन दिवसांनी वाढवल्यानंतर अगतिक झालेल्या या दोघांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. आपल्यावर अन्याय होत असल्याचे रडगाणे ते गायले पण न्यायालयाने त्यांना दंडाधिकारी न्यायालयातच दाद मागण्यास सांगून त्यांना याचिका मागे घ्यायला लावली. या सगळ्यातून हेच दिसते की, कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनात जो आव आणत होती की, आम्ही जेल भरो आंदोलन करतो आहोत, जेवढ्या जेल आहेत त्या तयार ठेवा वगैरे ही निव्वळ बकवास होती. दोन दिवस कोठडी वाढल्यावर ज्यांचे ब्लडप्रेशर वाढले ते जेल भरो करू शकत नाहीत, हे स्पष्ट झाले. आता तर आपल्यासमोर आंदोलनाची नवी कोणतीही योजना नाही, लवकरच आम्ही आंदोलनाच्या नव्या योजनेसह मैदानात येऊ असे आशुतोष रांका एका मुलाखतीत सांगत आहे.
हे ही वाचा:
इंजीनिअरिंगचे शिक्षण नाही; पण तयार केली उडती कार
‘रो-को’च्या दर्शनासाठी स्टेडियम हाऊसफुल्ल होणार!
जामिया विद्यापीठाच्या भिंतींवर ‘फ्री काश्मीर’चे नारे
विश्वविक्रमासह मोना अग्रवालला दुसरे सुवर्ण!
तिकडे याच सगळ्या आंदोलनातून आपल्या पोळ्या भाजू पाहणारे योगेंद्र यादव यांनीही कोलांटउडी मारली. त्यांची एक मुलाखत आपण पाहिली आहे ज्यात ते म्हणतात की, देशातील लोकशाहीचे भवितव्य संसदेच्या माध्यमातून लिहिले जाणार नाही तर ते रस्त्यावरील संघर्षाच्या माध्यमातून लिहिले जाईल. २० जुलैला संसदेवर जो मोर्चा काढण्यात आला त्यावेळी तो गोंधळ माजविण्यात आला, पोलिसांवर हल्ले झाले, अराजकतावादी तत्त्वे त्या आंदोलनात शिरली आणि त्यांनी तोडफोड, जाळपोळ याचा आधार घेत, दहशतीचे वातावरण तयार केले, त्यानंतर योगेंद्र यादव यांना असे मनापासून वाटू लागले होते. पण आता कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांवर झालेली कारवाई, दाखविलेला पोलिसी खाक्या यामुळे आंदोलनातली हवा निघून जाऊ लागल्यावर योगेंद्र यादव यांची भाषा बदलली. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मोदींचा ताबडतोब राजीनामा मागणे ही या आंदोलनातली मागणी असता कामा नये. त्यापेक्षा विरोधकांनी आंदोलन करावे आणि मग जेव्हा निवडणुका येतील तेव्हा त्या निवडणुकांना सामोरे जाऊन मोदी सरकारला उखडून फेकून द्यावे. योगेंद्र यादव यांची ही भाषा खूप काही सांगणारी आहे. जे संसदेच्या मार्गाने नाही तर रस्त्यावरील संघर्षातून संसदेचे भवितव्य निश्चित होईल म्हणतात ते आता मात्र निवडणुकीचा मार्ग पत्करा असे काकुळतीला येऊन सांगतात.
नेहा बोराने झुरळांना झटकून आपण कॉक्रोच जनता पार्टीसोबत कधी नव्हतो, ही भूमिका घेणे, कॉक्रोच जनता पार्टीने दिवाळीनंतरच आंदोलन करण्याचा पवित्रा घेणे आणि योगेंद्र यादव यांना संसदेचे भवितव्य निवडणुकीतूनच लिहिले जाईल असा साक्षात्कार होणे हे काय सुचवते ? यातून एकच गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे या आंदोलनाचा बोरा बिस्तरा आता गुंडाळला गेला आहे. मीडियातही याची अजिबात चर्चा नाही. जी स्पेस नेहा बोरा, अभिजित दिपके वगैरेना दिली जात होती, ती आता संपली आहे. आता काँग्रेसच्या समर्थकांनी म्हणा किंवा काँग्रेसच्या स्वतःच्या हँडलवरही एपस्टिन फाइलची जुनी दारू नव्या बाटलीत भरून त्याचा आनंद घेतला जात आहे. हरदीप पुरी हे कसे एपस्टिनला भेटले याचे फोटो टाकून गळपटलेल्या आंदोलनामुळे आलेली निराशा झटकून टाकण्याचे प्रयत्न केले जात आहेत. स्वतः त्यांचे नेते राहुल गांधीही आंदोलन अर्ध्यावर टाकून व्हिएतनामला निघून गेले आहेत. त्यामुळे ज्ञानेशकुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीला कुणी वालीच उरलेला नाही.
