घरस्पोर्ट्सविश्वविक्रमासह मोना अग्रवालला दुसरे सुवर्ण!

विश्वविक्रमासह मोना अग्रवालला दुसरे सुवर्ण!

आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची पॅरा नेमबाज मोना अग्रवाल हिने विश्वविक्रमाला गवसणी घालत दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन एसएच१ प्रकारात मोनाने ३५७.५ गुणांची विश्वविक्रमी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी तिने १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच१ प्रकारातही सुवर्णपदक जिंकले होते.

मोना हिने या कामगिरीसह स्वीडनच्या अ‍ॅना बेन्सन हिचा ३५६ गुणांचा विश्वविक्रम मोडीत काढला. बेन्सनने जुलै २०२६ मध्ये नोव्ही साद येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत हा विक्रम नोंदवला होता. तसेच दक्षिण कोरियाच्या ली युन-री हिच्या ३५५.७ गुणांच्या आशियाई विक्रमालाही मोनाने मागे टाकले.

अंतिम फेरीत मोनाचा अचूक निशाणा

पात्रता फेरीत मोनाने ५६६-१७एक्स गुणांसह सहावे स्थान मिळवले होते. दुसरीकडे, भारताचीच अवनी लेखरा हिने ५८०-२४एक्स गुणांसह अव्वल स्थान पटकावले. अवनीची ही कामगिरी आशियाई पॅरा गेम्समधील पात्रता फेरीचा विक्रम ठरली. मात्र, अंतिम फेरीत मोनाने दमदार पुनरागमन करत सुवर्णपदकावर कब्जा केला.

अंतिम फेरीत मोनाने गुडघ्यावरून आणि झोपून नेमबाजी करत सातत्यपूर्ण कामगिरी केली. उभे राहून नेमबाजीच्या फेरीतही तिने अचूक लक्ष्य साधत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.

चीनच्या झांग क्यूपिंग हिने ३५३.७ गुणांसह रौप्यपदक, तर दक्षिण कोरियाच्या किम मियोंग हिने ३४४.४ गुणांसह कांस्यपदक जिंकले. अवनी लेखरा हिला मात्र चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

मोनाची सुवर्णपदकांची दुहेरी कामगिरी

यापूर्वी मोनाने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच१ प्रकारात २५० गुणांची आशियाई विक्रमी कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेत अवनी लेखरा हिने २४९.६ गुणांसह रौप्यपदक मिळवले होते.

विश्वविक्रम आणि दोन सुवर्णपदकांच्या जोरावर मोना अग्रवाल हिने आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version