अफगाणिस्तानमध्ये एकटीने प्रवास करणाऱ्या केरळमधील लोकप्रिय महिला ट्रॅव्हल व्लॉगर ‘बॅकपॅकर अरुणिमा’ हिने बामियानमध्ये आपल्याला अटकेची धमकी देण्यात आल्याचा दावा केला आहे. सुरुवातीला तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये आपल्याला ‘मुजाहिदीन’ने अटक केल्याचे सांगत भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यासाठी मदत मागितली होती. मात्र, त्यानंतरच्या सविस्तर पोस्टमध्ये तिने प्रत्यक्षात अटक झाली नसून, अटक करण्याची धमकी देण्यात आली होती, असे स्पष्ट केले.
अरुणिमाने फेसबुकवरील पोस्टमध्ये एका अधिकृत पत्राचा अनुवाद शेअर केला. त्यात अधिकृत परवानगीपत्र नसल्यामुळे तिला अटक केल्याचा उल्लेख असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिने, “मी अफगाणिस्तानमध्ये संकटात आहे. मी बामियानमध्ये आहे,” असे म्हणत मदतीचे आवाहन केले.
अरुणिमाच्या म्हणण्यानुसार, बामियानमधील अधिकाऱ्यांनी “या देशाच्या कायद्यानुसार, एक महिला एकटी प्रवास करू शकत नाही,” असे सांगत तिने नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा केला. प्रत्येक प्रांतासाठी स्वतंत्र परवानगी आवश्यक असल्याचेही तिला सांगण्यात आले. मात्र, एकट्या महिलेला ही परवानगी मिळत नसल्यामुळे तिने ती घेतली नव्हती. यापूर्वी जलालाबादमध्येही एकटी प्रवास करत असल्याने तिला परवानगी नाकारण्यात आल्याचे तिने सांगितले.
हे ही वाचा:
इमिग्रेशन न करताच तीन इटालियन नागरिक म्युनिकला रवाना
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य, उद्धव ठाकरेंची नावे
चक्क कट्टर विरोधक यशवंत सिन्हा मोदींवर खुश
भारतीय संघाने जिंकले ज्युनियर महिला आशिया कपचे विजेतेपद
यानंतर अरुणिमाने बामियानला पोहोचण्यासाठी मदत केलेल्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्याने अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तिला पुढे जाण्याची परवानगी मिळाली. अरुणिमाने सांगितले की, ती अफगाणिस्तान सोडून उझबेकिस्तानला जाणार असल्याचे सांगितल्यानंतर तिच्याकडे दंडाची मागणी करण्यात आली. मात्र, चर्चा करून अखेरीस तिला परवानगीपत्राशिवाय पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली. महिला असल्यामुळेच आपल्याला या अडचणींचा सामना करावा लागला, असा दावा अरुणिमाने केला. या संपूर्ण प्रसंगात आपण अत्यंत घाबरले होते आणि आपल्यासोबत काहीतरी वाईट घडण्याची भीती वाटत होती, असेही तिने सांगितले.
