भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथील झोपडपट्ट्या आणि गरीब वस्त्यांचे व्हिडिओ चिनी व्लॉगर्सकडून चित्रीत केले जात आहेत. विशेष म्हणजे, हे व्हिडिओ चीनमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करताना ढाक्यातील परिसर नवी दिल्लीतील असल्याचे सांगितले जात आहे. बांगलादेशी वृत्तपत्र ‘प्रोथोम आलो’च्या तपास अहवालातून हा प्रकार उघड झाला आहे.
अहवालानुसार, ढाक्यातील उत्तरा सेक्टर १२ आणि टेकपारा परिसरात काही चिनी नागरिक व्हिडिओ शूटिंग करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हे व्लॉगर्स अनेक महिन्यांपासून अरुंद गल्ल्या, घरे, दुकाने आणि चहाच्या टपऱ्यांचे चित्रीकरण करत आहेत. हे व्हिडिओ वीचॅट आणि डोयिन या चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले जात आहेत. या व्हिडिओंमध्ये ‘मियानमियान’ नावाची चिनी महिला उत्तरा परिसरातील कालव्याजवळून लाइव्ह करताना दिसली. तिने हा परिसर दिल्लीतील असल्याचे सांगत तेथील घरे अस्वच्छ आणि मागास असल्याचे वर्णन केले.
हे ही वाचा:
पाकिस्तानी टीव्ही अँकरची पतीकडून गोळ्या झाडून हत्या
बालशोषणाचे २० हजार फोटो-व्हिडिओ बाळगल्याप्रकरणी सैफुद्दीन मलिकला अटक
गुरुग्राममधून वैध पासपोर्ट नसलेल्या १४ बांगलादेशींना अटक
दिवाळीच्या मुहूर्तावर ‘रामायण’ची ५६.१५ कोटींची कमाई
दरम्यान, काही व्लॉगर्सनी हे व्हिडिओ उत्पादनांच्या जाहिरातींसाठी तयार केले जात असल्याचे सांगितले आहे. मात्र, ढाक्यातील वस्त्या दिल्लीच्या असल्याचे का दाखवले जात आहे, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले नाही. काही व्लॉगर्स परवानगीशिवाय खासगी जागांमध्ये चित्रीकरण करत असल्याच्या तक्रारीही स्थानिकांनी केल्या आहेत.
