काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिवाळीला ‘खुशियों की ईद’ असे संबोधल्यानंतर दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाला राजकीय वादाची किनार मिळाली. यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. हिंदू सणांचा अपमान करून काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा, तसेच पक्षाची मानसिकता सनातनविरोधी असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
दिवाळीनिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, “दिवाळी हा भारतातील सर्व लोक साजरा करतात असा मोठा सण आहे. हा आनंदाचा सण असून, त्याला ‘खुशियों की ईद’ म्हणता येईल. ही अशी ईद आहे जी दीर्घकाळ चालत असते.” त्यांच्या या विधानावर भाजपने आक्षेप घेतला.
भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. दिवाळीसारख्या सणाच्या दिवशीही काँग्रेसला तुष्टीकरण आणि मतपेढीचे राजकारण सुचते, अशी टीका त्यांनी केली. “काल सोनिया गांधी बाबरीसाठी रडल्या, आज खर्गे आपल्या दिवाळी संदेशात लांगूलचालन करत आहेत. काँग्रेस सनातनविरोधी आहे,” असा आरोप त्यांनी केला. ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी यांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडल्याची घटना दूरचित्रवाणीवर पाहून आपण रडलो होतो, असे सांगितले होते. या घटनेमुळे भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करण्यासाठी दीर्घ संघर्ष करावा लागेल, याची जाणीव झाल्याचेही त्यांनी म्हटले होते.
हे ही वाचा:
मुंबईत दिवाळीच्या दोन दिवसांत आगीच्या ८९ घटना
चीनमध्ये १० कोटी नागरिक कर्जफेडीच्या संकटात
दिवाळीच्या रात्री आतषबाजी, दुसऱ्या दिवशी मुंबईत प्रदूषणाची कोंडी
फटाक्यांचा रेल्वे सिग्नल यंत्रणेला फटका; पश्चिम रेल्वे उशिराने
भाजपचे प्रवक्ते सी. आर. केसवन यांनीही मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. हिंदू भाविकांच्या श्रद्धा आणि भावनांचा अपमान करून काँग्रेस मतपेढीचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी खर्गे यांच्यावर यापूर्वी महाकुंभमेळ्याची खिल्ली उडवल्याचा आरोपही केला. तसेच राहुल गांधी यांनी छठपूजेला ‘नाटक’ म्हटल्याचा आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ‘नाच-गाणे’ संबोधल्याचा दावा करत काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
