दिवाळीच्या उत्सवादरम्यान मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत शहरात आगीच्या ८९ घटनांची नोंद झाली असून, त्यापैकी २८ घटना फटाक्यांमुळे घडल्याचे समोर आले आहे. या घटनांमध्ये चार जण जखमी झाले, तर अंधेरी पश्चिम येथील एका उंच इमारतीत लागलेल्या आगीत ५६ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा गुदमरून मृत्यू झाला.
गेल्या दोन दिवसांत मुंबईत नोंदवलेल्या आगीच्या ८९ घटनांपैकी २८ घटना फटाक्यांमुळे घडल्या. यात चार जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील रनवाल एलेगेंट या २७ मजली इमारतीत शनिवारी रात्री सुमारे ९.५० वाजता आग लागली. इमारतीच्या १७ व्या मजल्यावरील एका सदनिकेत ही आग लागली. घरातील विद्युत वायरिंग, उपकरणे आणि काही वस्तूंना आग लागून धूर संपूर्ण परिसरात पसरला. प्राथमिक अंदाजानुसार, घरातील देवघरात लावलेल्या दिव्यामुळे आग लागली असावी, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या वेळी कुटुंबीय रात्रीच्या जेवणासाठी बाहेर गेले होते. घरातील ज्येष्ठ नागरिकांना घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सुरक्षित बाहेर काढले. मात्र, इमारतीतील ५६ वर्षीय सुरक्षा रक्षक धनपत महातू धुरापासून बचाव करण्यासाठी जिन्याऐवजी लिफ्टमध्ये गेले. धुरामुळे लिफ्ट बंद पडल्याने ते आत अडकले. त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यांना कूपर रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. अग्निशमन दलाने रात्री १०.३७ वाजेपर्यंत आग नियंत्रणात आणली.
हे ही वाचा:
चीनमध्ये १० कोटी नागरिक कर्जफेडीच्या संकटात
दिवाळीच्या रात्री आतषबाजी, दुसऱ्या दिवशी मुंबईत प्रदूषणाची कोंडी
फटाक्यांचा रेल्वे सिग्नल यंत्रणेला फटका; पश्चिम रेल्वे उशिराने
दिवाळीच्या मुहूर्तावर ‘रामायण’ची ५६.१५ कोटींची कमाई
दरम्यान, रविवारी दादर पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील कामगार स्टेडियम परिसरात लाकूड आणि बांबूच्या साहित्याला आग लागली. अग्निशमन दलाने १५ मिनिटांत आग विझवली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
