घरदेश दुनियानेपाळच्या लष्करप्रमुखांच्या मागे हिंदू राजाचे चित्र! काय मिळतो संदेश?

नेपाळच्या लष्करप्रमुखांच्या मागे हिंदू राजाचे चित्र! काय मिळतो संदेश?

लष्करप्रमुखांकडून नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड अराजकता आणि हिंसाचार पसरला आहे. आंदोलकांनी हिंसक भूमिका घेत राजकीय नेत्यांवर आणि त्यांच्या घरांवर हल्ले चढवले. यानंतर लष्कराने सूत्र हाती घेत सध्या कर्फ्यू लावला आहे. अशातच लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांनी देशाला संबोधित करून नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. यासोबतच, त्यांनी निदर्शकांना इशाराही दिला आहे की, हिंसाचार झाला तर कठोर पावले उचलली जातील.

लष्करप्रमुख सिग्देल राष्ट्राला संबोधित करत होते, तेव्हा त्यांच्या मागे नेपाळचा राष्ट्रध्वज आणि एक फोटो दिसत होता. या फोटोमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. या फोटोच्या माध्यमातून लष्करप्रमुख कोणता संदेश देऊ पाहत आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे. लष्करप्रमुख सिग्देल यांच्या मागे असलेले चित्र हे १८ व्या शतकाच्या मध्यातील एका हिंदू राजाचे आहे, ज्यांचे नाव पृथ्वी नारायण शाह होते. या राजाने प्रादेशिक एकात्मतेसाठी मोहीम राबवून आधुनिक नेपाळचा पाया रचला होता. हे चित्र समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. या चित्रात काही छुपा संदेश आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

नेपाळचा इतिहास पाहता बहुतेक काळ हा शाह राजवंशाच्या राजेशाहीखाली चालला आहे. २००८ मध्ये माओवादी बंडामुळे तत्कालीन शाह राजघराण्याचे प्रमुख राजा ज्ञानेंद्र शाह यांना पदत्याग करावा लागला. तेव्हापासून, आजपर्यंत नेपाळमध्ये एकूण १३ वेळा सरकारे स्थापन झाली आहेत आणि ती पाडण्यात आली. राजकीय अस्थिरतेमुळे, या वर्षाच्या सुरुवातीला नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा स्थापित करण्यासाठी निदर्शने झाली होती. नेपाळच्या सध्याच्या लोकशाही व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि घराणेशाहीमुळे असलेल्या निराशेमुळे राजेशाही परत येण्याबद्दल चर्चा आहे. त्यामुळे अशातच सिग्देल यांनी राजा पृथ्वी नारायण शाह यांचे चित्र प्रदर्शित करणे हे नेपाळमध्ये राजेशाहीचे युग परत येऊ शकते याचे संकेत मानले जात आहे.

हे ही वाचा

“अमेरिकेने जे केले तेच आम्ही केले” दोहा हल्ल्यानंतर नेतान्याहू असं का म्हणाले?

भाषण करत असतानाच ट्रम्प यांचे विश्वासू चार्ली कर्क यांच्यावर झाडल्या गोळ्या

दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित तिघांना अटक; पाकिस्तानी संबंध उघड

“भारताला दहशतवाद पुरस्कृत देशाकडून धडा घेण्याची गरज नाही”

शिवाय नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदू राष्ट्राची सुरुवात याचे हे चित्र लक्षण आहे का? असा सवाल ही विचारला जात आहे. काहींचे म्हणणे आहे की, राजा पृथ्वी नारायण शाह यांचे नाव नेपाळच्या अनेक संस्था आणि लष्करी संरचनांवर आधीच आहे यातून त्यांच्याबद्दलचा आदर दिसतो. सप्टेंबर २०२४ मध्ये जेव्हा सिग्देल यांनी लष्करप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हाही त्यांच्या पार्श्वभूमीवर पृथ्वी नारायण शाह यांचे चित्र दिसत होते. पृथ्वी नारायण शाह यांचा जन्म १७२३ मध्ये झाला. वयाच्या २० व्या वर्षी ते सिंहासनावर बसले आणि आधुनिक नेपाळचे निर्माते बनले. राजपूत वंशाच्या शाह घराण्याचे ते धर्माभिमानी हिंदू होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version