रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गौरवोद्गार काढले आहेत. पुतिन यांनी रशिया- युक्रेन युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा केली असून, शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी त्यांच्याकडे अतिशय चांगल्या कल्पना असल्याचे म्हटले आहे. मॉस्कोमधील एका कार्यक्रमात बोलताना पुतिन म्हणाले की, भारत आणि रशियाचे चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध असूनही, मोदी सातत्याने युक्रेनमधील संघर्ष संपवण्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत.
पंतप्रधान मोदी हे युक्रेन संघर्षाचा परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्यात स्वारस्य असलेल्या जागतिक नेत्यांपैकी एक असल्याचे पुतिन यांनी म्हटले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या जागतिक नेत्यांपैकी एक आहेत, जे आपले खूप चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध असूनही, युक्रेनमधील संघर्ष संपवण्याबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित करतात,” असे पुतिन म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदींना परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्यात प्रचंड रस आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडे खूप चांगल्या कल्पना आहेत. त्या अर्थाने, साहजिकच, पंतप्रधान तटस्थ भूमिका घेतात, पण संघर्ष संपुष्टात आणण्यात त्यांचा रस आहे. हे थेटपणे सांगणे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटते. आणि आम्ही पंतप्रधानांच्या कल्पनांबद्दल त्यांचे आभारी आहोत.”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन युद्धाबाबत संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तोडगा काढण्याची भूमिका सातत्याने मांडली आहे. गेल्या महिन्यात ब्रिक्स परिषदेसाठी भारत दौऱ्यावर आलेल्या पुतिन यांच्यासोबत ११ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीतही मोदींनी ही भूमिका स्पष्ट केली होती. युक्रेन संघर्षाचा तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच मार्ग असल्याचे मोदींनी सांगितले होते. तसेच हा संघर्ष लवकरात लवकर संपावा, अशी मानवतेची इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
हे ही वाचा:
मक्कातील ग्रँड मशिदीत आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न? सौदीकडून स्पष्टीकरण
फ्लाय दुबईचा ‘तो’ हल्लेखोर वैमानिक जिहादी विचारसरणीचा
राहुल गांधींनी गौरवलेल्या ‘मोहम्मद दीपक’ला धमकी प्रकरणी अटक
कलिनिनग्राडवर हल्ला झाल्यास अण्वस्त्रांसह पलटवार
यापूर्वी किर्गिझस्तानमधील बिश्केक येथे एससीओ बैठकीच्या निमित्ताने पुतिन यांची भेट घेताना मोदींनी ‘हे युद्धाचे युग नाही’ या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. अंतहीन युद्धाच्या परिस्थितीतून बाहेर पडून युद्धाच्या समाप्तीकडे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. भारत युक्रेनच्या मुद्द्यावर सर्व शांततापूर्ण मार्गांना पाठिंबा देत असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे. पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबतच्या चर्चांमध्येही मोदींनी संवादाच्या माध्यमातून संघर्ष सोडवण्याची गरज अधोरेखित केली आहे.
