भारताने आशिया खंडात आपला प्रभाव आणि सामर्थ्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आशियातील तिसरा सर्वाधिक शक्तिशाली देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. त्याचबरोबर देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूटच्या ‘एशिया पॉवर इंडेक्स’च्या यादीत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. या अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आशियातील दुसरे सर्वाधिक प्रभावशाली नेते ठरले आहेत.
या यादीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पहिल्या क्रमांकावर आहेत.
या अहवालात भारताच्या राजनैतिक प्रभावाला देशाची प्रमुख ताकद म्हणून अधोरेखित करण्यात आले आहे. या श्रेणीत भारताला ७०.३ गुण मिळाले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रादेशिक नेतृत्वाच्या मूल्यांकनातही सुधारणा करण्यात आली आहे. त्यांच्या क्रमवारीत तीन स्थानांची वाढ झाली असून, शी जिनपिंग यांच्यानंतर त्यांना आशियातील दुसरे सर्वाधिक प्रभावशाली प्रादेशिक नेते म्हणून स्थान देण्यात आले आहे.
हे ही वाचा:
अल्काराजचा टेनिस विश्वावर पुन्हा ठसा
सिराजला वगळण्याचा निर्णय कठीणच
गारठलेल्या सकाळी मुंबई धुरक्यात हरवली
आमदार संजय जयस्वाल यांच्या ‘सेवालय’चे उद्घाटन
या निष्कर्षांवर भाष्य करताना लोवी इन्स्टिट्यूटमधील दक्षिण-पूर्व आशिया कार्यक्रमाचे संचालक आणि ‘एशिया पॉवर इंडेक्स’चे प्रकल्प प्रमुख डॉ. हंटर मार्स्टन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, भारताचा प्रभाव वाढत आहे. भारताने ४०.५ गुणांचा टप्पा गाठला असून, एक प्रमुख शक्ती म्हणून त्याचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. २०१८ पासून चीन आणि भारत यांच्यातील शक्तीचे अंतर आता सर्वात कमी झाले आहे. आर्थिक क्षमतेत काहीशी घसरण झाली असली, तरी शी जिनपिंग यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता आशियातील दुसरे सर्वाधिक प्रभावशाली प्रादेशिक नेते मानले जात आहे.
या अहवालात भारताला ‘मेजर पॉवर’ अर्थात प्रमुख शक्तीचा दर्जा देण्यात आला आहे.
२०२६ च्या ‘एशिया पॉवर इंडेक्स’मध्ये २७ देश आणि प्रदेशांचे १३१ निकषांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये शक्तीशी संबंधित आठ प्रमुख निकषांचा समावेश आहे. आर्थिक आणि लष्करी क्षमता, देशाची मजबुती, राजनैतिक प्रभाव तसेच आर्थिक संबंध या बाबींच्या आधारे हे मूल्यांकन करण्यात आले आहे.
आर्थिक संबंधांच्या बाबतीतही भारताची स्थिती सुधारली आहे. या श्रेणीत भारताने दोन स्थानांची प्रगती करत सातवे स्थान मिळवले आहे. प्रादेशिक व्यापार आणि गुंतवणूक संबंधांमधील तुलनेने स्थिरतेचा यासाठी फायदा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
