घरराजकारणराष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय शरद आणि सुनेत्रा पवारांच्याच हाती

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय शरद आणि सुनेत्रा पवारांच्याच हाती

मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्ट विधान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र यायचे की स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम ठेवायचे, याचा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीच घ्यायचा आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला असून या निर्णयाकडे राज्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित दिवाळी स्नेहमेळाव्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट सध्या स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित पक्षांच्या नेतृत्वाकडे आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुती सरकारमधील घटक पक्ष असल्यामुळे विलीनीकरणासंदर्भात कोणताही निर्णय घेताना महायुतीतील प्रमुख सहकारी म्हणून भाजपला विश्वासात घेणे आवश्यक ठरेल, असेही त्यांनी सूचित केले. या विषयावर अद्याप शरद पवार किंवा सुनेत्रा पवार यांनी भाजपशी अधिकृत चर्चा केलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांच्या भेटीगाठींमुळे विलीनीकरणाच्या चर्चांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यासह काही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र आले असते, असे विधान केले होते. त्यामुळे या घडामोडींमधून विलीनीकरणाच्या दिशेने काही हालचाली सुरू आहेत का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
हे ही वाचा:
अपघातप्रवण ठिकाणी आधीच तैनात असणार रुग्णवाहिका?

सतेज पाटलांना दणका देत गोकुळ अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील

शुभेंदू अधिकारी यांच्यावरील टिप्पणीप्रकरणी पोलीस इन्स्पेक्टर निलंबित

अपघातप्रवण ठिकाणी आधीच तैनात असणार रुग्णवाहिका?

यावेळी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची अजित पवार यांच्या नेतृत्वाशी तुलना करण्याबाबत विचारले असता, फडणवीस यांनी अशी तुलना करणे योग्य नसल्याचे सांगितले. अजित पवार यांना राज्याच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आणि प्रशासनाची सखोल जाण होती. सुनेत्रा पवार सध्या नव्या परिस्थितीत आपली जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे दोघांच्या नेतृत्वाची तुलना करणे अन्यायकारक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे भवितव्य शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या पुढील भूमिकेवर अवलंबून असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version