कोल्हापूर दूध महासंघ अर्थात गोकुळच्या चेअरमनपदी महायुतीचा उमेदवार निवडून आला. राजेश पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते गोकुळचे चेअरमन बनले.
महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. राजेश पाटील यांनी शशिकांत चुयेकर यांचा १६-१३ असा पराभव करत अध्यक्षपद पटकावले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही निवडणूक पार पडली.
चंदगड तालुक्याचे राजेश पाटील यांना अध्यक्षपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर पार पडली आहे. या निवडणुकीत पारडं जड असतानाही सतेज पाटील यांच्या हातून सत्ता गेली आहे.
गोकुळमध्ये झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे १३ तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले होते. अध्यक्षपदासाठी १४ चा कोरम आवश्यक असताना तशी परिस्थिती मात्र नव्हती. हा पेच सोडवण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र यावे आणि तोडगा काढावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवले होते. पण तसे झाले नाही. शेवटी गोकुळवर चार नामनिर्देशित सदस्य नेमण्यात आले. सरकारने त्याना मताचा अधिकार दिला.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मंगळवारी ही निवडणूक पार पडली. यावेळी सुरुवातीलाच समविचारी आघाडीच्या सदस्यांनी सरकार नियुक्त संचालकांच्या मतदानावर आक्षेप घेतला. हे सदस्य निवडून आलेले नाहीत. त्यांना मतदानाचा अधिकार कसा? असा आक्षेप या सदस्यांनी घेतला. मात्र, सरकारी अध्यादेश, नियम आणि कोर्टाचा दाखला देत समविचारी आघाडीचा हा आक्षेप फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात झाली.
