झारखंड आणि बिहारमध्ये १३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेला माओवादी कमांडर संजय यादव ऊर्फ गोदराम याच्या माहितीवरून पलामू जिल्हा पोलिसांनी जंगलातून एक INSAS रायफल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत. संजय यादवला दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) ठाकुर्ली येथून अटक केली होती. चौकशीनंतर त्याला पलामू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
संजय यादव हा प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) संघटनेचा विभागीय समिती सदस्य आहे. त्याच्यावर झारखंडमध्ये १० लाख रुपये, तर बिहारमध्ये तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. दोन्ही राज्यांमध्ये त्याच्याविरोधात एकूण ५३ गुन्हे दाखल असून, तो या प्रकरणांमध्ये वॉन्टेड होता. यापैकी पलामूमध्ये २३, बिहारमधील औरंगाबादमध्ये २० आणि गया जिल्ह्यात १० गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर हत्या, पोलिसांवरील हल्ले, खंडणी वसुली, स्फोट, जाळपोळ तसेच शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याचे आरोप आहेत. तो पलामू जिल्ह्यातील छतरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगन (तिलहडवा) गावचा रहिवासी आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, संजय यादव अनेक मोठ्या नक्षली घटनांमध्ये आरोपी आहे. २५ आणि २६ एप्रिल २०१९ च्या मध्यरात्री हरिहरगंज बाजारातील हिरा कॉम्प्लेक्समध्ये भाजपच्या निवडणूक कार्यालयाचा स्फोट घडवून आणण्यात आला होता. तसेच तुरी गावाजवळ बताने नदीवरील बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या ठिकाणी यंत्रसामग्री आणि तात्पुरत्या शेडला आग लावण्यात आली होती. या घटनांमध्ये त्याचे नाव समोर आले होते.
हे ही वाचा:
मंदिर परिसरात मांसाचे अवशेष टाकण्यावरून वाद; पुजाऱ्यासह ग्रामस्थांना मारहाण
काळबादेवीत भररस्त्यावर रॉकेट फोडणाऱ्या तरुणावर गुन्हा
यमुनेत आता जलसफर; ‘नमो यमुना रिव्हर सफारी’ आजपासून सुरू
ट्रम्प म्हणतात संघर्ष संपला; इराण म्हणतो शरण या!
दरम्यान, महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातून अटक केल्यानंतर संजय यादवच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे झारखंड पोलिसांनी जंगलात शस्त्रसाठा शोधून काढला. या कारवाईत INSAS रायफल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
