देशात रस्ते अपघातांची संख्या आणि त्यात होणारे मृत्यू ही गंभीर समस्या बनली आहे. अनेकदा अपघातानंतर जखमींना वेळेत रुग्णालयात पोहोचवता न आल्याने त्यांचा जीव जातो. हीच बाब लक्षात घेऊन आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. अपघात होण्याची शक्यता अधिक असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिका आधीच तैनात करता याव्यात, यासाठी संशोधकांनी देशभरातील अपघातप्रवण ठिकाणांचा नकाशा तयार केला आहे.
या नकाशात देशातील ४,४०३ अतिअपघातप्रवण ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी एकूण ४,२३७ रुग्णवाहिका तैनात करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आयआयटी मद्रासचे प्राध्यापक व्यंकटेश बालसुब्रमण्यम आणि त्यांच्या पथकाने ही माहिती दिली आहे.
नेमका कसा काम करणार हा नकाशा?
या यंत्रणेचे नाव ‘डायनॅमिक अॅम्ब्युलन्स पोझिशनिंग’ असे आहे. आयआयटी मद्रासच्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रोड सेफ्टी आणि आरबीजी लॅब्स यांनी हा नकाशा विकसित केला आहे. यासाठी रस्ते अपघातांची ठिकाणे, अपघाताची तारीख आणि वेळ, अपघाताची तीव्रता, मृतांची संख्या तसेच राष्ट्रीय महामार्गांची माहिती वापरण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे ज्या रस्त्यांवर वारंवार अपघात होतात, अशी ठिकाणे नकाशावर निश्चित केली जातात. त्यानंतर या ठिकाणांच्या आसपास रुग्णवाहिका कुठे उभ्या केल्यास अपघातग्रस्तांपर्यंत त्या लवकर पोहोचू शकतील, याचा अंदाज घेतला जातो.
या नकाशात राज्य, जिल्हा, आठवड्यातील दिवस आणि दिवसातील तीन तासांच्या कालावधीनुसार माहिती पाहण्याची सुविधाही आहे. त्यामुळे कोणत्या भागात आणि कोणत्या वेळेत अपघातांची शक्यता अधिक असते, याचा अभ्यास करता येणार आहे. रुग्णालयांचे स्थानही या नकाशावर दाखवता येते.
‘गोल्डन अवर’मध्ये मदत पोहोचवण्यावर भर
अपघातानंतरचा पहिला तास म्हणजेच ‘गोल्डन अवर’ जखमी व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास मृत्यू टाळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये देशात ४ लाख ६१ हजार ३१२ रस्ते अपघात झाले. त्यात १ लाख ६८ हजार ४९१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अपघातानंतर तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध होणे किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट होते.
हा नकाशा अद्याप सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेला नाही. तसेच कोणत्याही राज्याने त्याची अधिकृत अंमलबजावणी सुरू केलेली नाही. मात्र, तामिळनाडूमध्ये या पद्धतीचा वापर करण्याबाबत चर्चा सुरू आहे. राज्यातील १०८ रुग्णवाहिका सेवेसाठी या नकाशाच्या आधारे निश्चित केलेल्या ठिकाणांचा विचार केला जात आहे.
