महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काही काळ थंडावलेल्या विलीनीकरणाच्या चर्चांना आता नव्याने वेग मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सविस्तर चर्चा झाली होती, असा दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाच्या प्रश्नावर केलेल्या सूचक विधानामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
बुधवारी सकाळी बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला समजतील,” असे एका वाक्यात उत्तर दिले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे विलीनीकरणाची शक्यता पूर्णपणे नाकारलेली नसल्याचे राजकीय संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही किंवा त्यासाठी निश्चित कालमर्यादाही स्पष्ट केलेली नाही.
हे ही वाचा:
भारताविरुद्ध न्यूझीलंडची कसोटी फौज सज्ज
इस्रायलच्या राफेलकडून दीर्घ पल्ल्याचे नवे सुपर आइस क्रूझ क्षेपणास्त्र
सचिनच्या १०० शतकांच्या साक्षीदार बॅट्स आता संग्रहालयात!
त्रिपुरात निवडणुकीपूर्वीच भाजपचे ७७ उमेदवार बिनविरोध विजयी
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अलीकडेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान १० नोव्हेंबरनंतर आपण एकत्र बसून चर्चा करू, असे शरद पवार यांनी सांगितल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. त्यानंतर सुनील तटकरे यांनीही दोन्ही पक्षांमध्ये विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याचे संकेत दिले. अजित पवार यांच्या निधनानंतर थांबलेल्या राजकीय प्रक्रियेला पुन्हा चालना मिळण्याची शक्यता त्यामुळे व्यक्त केली जात आहे. मात्र, दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाकडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
विलीनीकरण झाल्यास पक्षाचे नेतृत्व कोणाकडे असणार, संघटनात्मक जबाबदाऱ्या कशा वाटल्या जाणार आणि सत्तेतील पदांचे समीकरण काय असेल, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. चर्चेत असलेल्या संभाव्य फॉर्म्युल्यानुसार पक्षाध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे, कार्याध्यक्षपद सुप्रिया सुळे यांच्याकडे आणि उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम ठेवण्याचा पर्याय असल्याची चर्चा आहे. तर दुसऱ्या पर्यायात कार्याध्यक्षपद पार्थ पवार यांच्याकडे देण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र, हे सर्व प्रस्ताव आणि राजकीय तर्कवितर्क असून त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या सूचक विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
