घरस्पोर्ट्सभारताविरुद्ध न्यूझीलंडची कसोटी फौज सज्ज

भारताविरुद्ध न्यूझीलंडची कसोटी फौज सज्ज

भारताविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेटने आपला संघ जाहीर केला आहे. दुखापतीमुळे टी-२० आणि एकदिवसीय मालिकेला मुकलेल्या रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. या दोघांच्या वापसीमुळे न्यूझीलंडची फलंदाजी अधिक मजबूत झाली असून, भारताला त्यांच्याविरुद्ध कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

रचिन रवींद्रला सप्टेंबर महिन्यात एका प्रमोशनल शूटदरम्यान झेल पकडण्यासाठी सूर मारताना उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला भारताविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. दुसरीकडे, डेव्हॉन कॉनवेला एकदिवसीय मालिकेपूर्वी सरावादरम्यान दुखापत झाली. मॅट हेन्रीसोबत झालेल्या धडकेमुळे त्याला डोक्याला दुखापत आणि कन्कशनचा त्रास झाला होता. त्यामुळे तोही वनडे मालिकेत खेळू शकला नव्हता. आता दोघेही कसोटी मालिकेसाठी पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत.

न्यूझीलंड क्रिकेटने प्रसिद्धीपत्रकाद्वारे रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे आणि यष्टिरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेल हे आपापल्या दुखापतींमधून सावरत असल्याचे स्पष्ट केले आहे. पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध होण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. ब्लंडेलने भारताविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांत सहभाग घेतल्यास त्याच्या कारकिर्दीतील ५० कसोटी सामन्यांचा टप्पा पूर्ण होणार आहे.

इंग्लंडला त्यांच्याच भूमीत हरवणाऱ्या संघावर विश्वास!

न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या मालिकेसाठी बहुतांश अनुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. इंग्लंडच्या भूमीवर इंग्लंडला २-१ असे पराभूत करणाऱ्या संघातील अनेक खेळाडूंचा या संघात समावेश आहे. मात्र, विल ओ’रूर्के याला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे, तर बेन सिअर्स आणि जॅक फॉल्क्स यांना दुखापतीमुळे संघात स्थान मिळालेले नाही.

दरम्यान, न्यूझीलंडच्या प्रशिक्षकवर्गातही बदल झाला आहे. माजी यष्टिरक्षक फलंदाज बीजे वॉटलिंग भारताविरुद्धच्या मालिकेतून न्यूझीलंडचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नव्या भूमिकेला सुरुवात करणार आहेत. ते ल्यूक रॉन्ची यांची जागा घेतील.

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या दृष्टीने मालिका महत्त्वाची!

२०२७ मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी न्यूझीलंडसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सध्या डब्ल्यूटीसी गुणतालिकेत न्यूझीलंड अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे भारताविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या या मालिकेत विजय मिळवून आपले अव्वल स्थान कायम राखण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल.

भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ :

टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, मॅट हेन्री, काइल जेमिसन, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, नॅथन स्मिथ, ब्लेअर टिकनर आणि विल यंग.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version