आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने आपल्या संघात मोठा बदल केला आहे. गेल्या तीन हंगामांत मुंबईचे नेतृत्व सांभाळणाऱ्या हार्दिक पांड्याला संघाने निरोप दिला असून, त्याच्या जागी पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला आहे. या खेळाडूंच्या अदलाबदलीनंतर मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर खास पोस्ट करत हार्दिकला शुभेच्छा दिल्या, तर अर्शदीपचे जल्लोषात स्वागत केले. त्यामुळे आयपीएल २०२७ च्या हंगामासाठी मुंबईची नवी रणनीती चर्चेचा विषय ठरली आहे.
मुंबई इंडियन्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर अनेक पोस्ट शेअर करत हार्दिकच्या योगदानाची आठवण करून दिली. ‘हार्दिक, ब्लू अँड गोल्ड जर्सी अभिमानाने आणि उत्साहाने परिधान केल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,’ अशा शब्दांत फ्रँचायझीने त्याला निरोप दिला. आणखी एका पोस्टमध्ये ‘चढ-उतारांच्या प्रवासात मुंबई इंडियन्सच्या कथेचा भाग बनल्याबद्दल धन्यवाद,’ असे म्हणत हार्दिकच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.
हार्दिक पांड्या आता आयपीएल २०२७ मध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. ट्रेड डीलअंतर्गत तो १८ कोटी रुपयांना पंजाबच्या संघात दाखल झाला आहे. दुसरीकडे, २०१९ पासून पंजाब किंग्सचा महत्त्वाचा खेळाडू असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. हार्दिकच्या बदल्यात मुंबईने अर्शदीपला आपल्या संघात घेतले असून, त्याच्यासाठीही १८ कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे.
बुमराह-अर्शदीपची जोडी फलंदाजांची धुलाई करणार!
अर्शदीपच्या आगमनाने मुंबई इंडियन्सची वेगवान गोलंदाजी अधिक धारदार होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग ही भारतीय टी-२० संघातील यशस्वी वेगवान गोलंदाजांची जोडी आता आयपीएलमध्येही एकाच संघाकडून खेळणार आहे. या जोडीच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी फलंदाजांना सुरुवातीपासूनच अडचणीत आणण्याची मुंबईची योजना असू शकते.
मुंबई इंडियन्सने बुमराह आणि अर्शदीप यांचा एकत्रित फोटो शेअर करत फलंदाजांना सूचक इशाराही दिला. ‘प्रिय फलंदाजांनो, आता स्टंप उडतील, चेंडू बॅटची कड घेतील, पंचांचे बोट वर जाईल आणि पायांची बोटेही सांभाळून ठेवा,’ अशा आशयाची मिश्किल पोस्ट करत या जोडीच्या गोलंदाजीची झलक दाखवली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी गोलंदाजीची सुरुवात करणारी ही जोडी आता मुंबईच्या जर्सीतून प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
पंजाबकडूनही अर्शदीपला भावनिक निरोप
दरम्यान, अर्शदीप सिंगच्या जाण्याने पंजाब किंग्सनेही भावनिक पोस्ट शेअर केली. ‘एका युवा सिंहापासून पंजाबला अभिमान वाटावा असे नाव बनण्यापर्यंतचा तुझा प्रवास खास राहिला. अर्शदीप, हे घर नेहमीच तुझे असेल,’ अशा शब्दांत पंजाबने त्याला निरोप दिला.
एकीकडे हार्दिक पांड्याच्या रूपाने मुंबईने अष्टपैलू खेळाडूला निरोप दिला, तर दुसरीकडे अर्शदीपच्या रूपाने दर्जेदार वेगवान गोलंदाजाला संघात स्थान दिले आहे. आता बुमराह आणि अर्शदीप ही जोडी आयपीएलमध्ये किती धुमाकूळ घालते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. मुंबई इंडियन्सच्या या नव्या ‘पेस अटॅक’मुळे आगामी हंगामात प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांची कसोटी लागणार, हे मात्र निश्चित!
