महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने एक्सवर पोस्ट करत महात्मा गांधींचे विचार कसे आवश्यक आहेत, याविषयी आपले विचार मांडले. गांधींजींची आठवण कायमच प्रकर्षाने यायला हवी, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
लोकशाहीत जनता सार्वभौम असते याची सत्ताधाऱ्यांना अधूनमधून आठवण करून दिली पाहिजे. राजकीय पक्षांची आंदोलनं, मोर्चे आणि त्यातला जनसहभाग हे सर्व सत्ताधाऱ्यांना जाणीव करून देण्याचा मार्ग आहे हे विसरू नये. आणि हेच गांधीजींच्या शिकवणीचं सार आहे, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ते लिहितात की, सामान्य माणसाच्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर, त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सरकारची मालकी नसते हे गांधीजींनी दाखवून दिलं.
त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया लिहिल्या असून त्यात एक प्रतिक्रिया आहे, ती म्हणजे आठवण करून काय फायदा ? त्यांच्या मार्गावर चालायला हवेत.परंतु आपण तसे काही करू शकत नाही. गांधीजी म्हणायचे एका गालावर चापट मारली की,त्याला मारून प्रत्युत्तर देता कामा नये. परंतु आपण मनसे तसे काही करू शकत नाही.
राज ठाकरेंनी म्हटले आहे की, आज महात्मा गांधीजींची जयंती. खरंतर कुठल्याही महापुरुषाची आठवण फक्त त्याच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला काढायची, त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करायचा आणि फोटो काढायचे इतक्या पुरतेच आपल्याला महापुरुष आठवतात. स्मारकं म्हणजे पुतळे ही आपली आवडती व्याख्या आणि आता पुतळ्यांच्या सोबत फोटो ही आपली नवीन श्रद्धांजली. असो. पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात गांधीजींची आठवण खरंतर अधिक प्रकर्षाने यायला हवी. कारण त्यांनी सत्तेला प्रश्न विचारायला शिकवलं… आणि प्रश्न विचारणं हे सद्य सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. प्रश्न विचारले की, ते आणि त्यांच्या समर्थकांच्या ‘ ट्रोळ्या ‘ तुम्हाला देशद्रोही ठरवायला आतुरच असतात.
हे ही वाचा:
फुकेतला चाललेली २१ कोटींच्या केटामाइनची तस्करी उधळली
भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार कराराला वेग
मक्कातील ग्रँड मशिदीत आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न? सौदीकडून स्पष्टीकरण
खासदार नसलेल्यांचा गोतावळा उबेसाठी एकत्र !
गांधीजींनी या देशाला दिलेली सर्वात मोठी गोष्ट कोणती? मला वाटतं—सत्तेला ‘नाही’ म्हणण्याचं सामान्य माणसाचं सामर्थ्य! सरकारकडे कायदा असतो, सत्तेची पाशवी शक्ती असते, सोयीने कायदा बदलण्याची शक्यता असते आणि या कायद्याच्या आधारावर गुन्हेगार ठरवण्याची शक्ती ते स्वतःकडे अबाधित ठेवतात. पण एवढं सगळं असूनही सामान्य माणसाच्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर, त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सरकारची मालकी नसते हे गांधीजींनी दाखवून दिलं. सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीजच्या काळात या क्षमतेवरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सर्वानी सावध राहायला हवं.. लोकशाहीत जनता सार्वभौम असते याची सत्ताधाऱ्यांना अधूनमधून आठवण करून दिली पाहिजे. राजकीय पक्षांची आंदोलनं, मोर्चे आणि त्यातला जनसहभाग हे सर्व सत्ताधाऱ्यांना जाणीव करून देण्याचा मार्ग आहे हे विसरू नये. आणि हेच गांधीजींच्या शिकवणीचं सार आहे. म्हणून गांधीजी सत्ताधाऱ्यांना फक्त श्रद्धांजली पुरते हवे आहेत बाकीचे गांधीजी त्यांच्या सोयीचे नाहीत. पण लोकशाहीला गांधीजी कायम आवश्यक असतात हे आपण विसरता कामा नये. महात्मा गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !
