कामाच्या ठिकाणी वाढणारा ताण आणि कामाचा अतिरिक्त भार कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतो, यावर मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कामाच्या प्रचंड ताणामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याला केवळ नैसर्गिक मृत्यू ठरवून नुकसानभरपाई नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यातील एका महिला कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी न्यायमूर्ती पी. मुरुगन यांनी १० नोव्हेंबर २०२६ रोजी हा निर्णय दिला.
थेनी येथील एका कंपनीत काम करणाऱ्या कुमुथावल्ली (वय ५१) यांना दरमहा ९ हजार रुपये वेतन मिळत होते. कामाच्या वाढत्या ताणामुळे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता. एके दिवशी काम करत असताना त्या अचानक बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र पुढील उपचारांसाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या मुलीने नुकसानभरपाईची मागणी केली. कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी समूह विमा पॉलिसी घेतली होती. मात्र, हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगत विमा कंपनीने भरपाई देण्यास नकार दिला.
हे ही वाचा:
अमेरिकेला ८,६०६ टन साखर निर्यातीसाठी भारताची मंजुरी
खासगी गुंतवणुकीत सहा महिन्यांत २६.६ लाख कोटींच्या प्रकल्पांची घोषणा
ऑक्टोबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ९ टक्क्यांनी झेप
बर्ड फ्लूचा पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका
या प्रकरणात कर्मचारी भरपाई आयुक्तांनी मृत महिलेच्या कुटुंबाला ५.३२ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी ३ लाख रुपये विमा कंपनीने, तर २.३२ लाख रुपये कंपनी मालकाने द्यायचे होते. या रकमेवर १२ टक्के वार्षिक व्याज देण्याचेही आदेश देण्यात आले होते. मात्र, विमा कंपनीने या निर्णयाला मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले. मृत्यूला अपघात म्हणता येणार नाही, असा दावा कंपनीने केला.
न्यायालयाने विमा कंपनीचे अपील फेटाळून भरपाईचा आदेश कायम ठेवला. कर्मचारी भरपाई कायद्याच्या कलम ४अ(३) नुसार नुकसानभरपाईवर किमान १२ टक्के वार्षिक सरळ व्याज देणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या निकालामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा, कामाच्या ताणाचा आणि सुरक्षित कामाच्या वातावरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, कामाच्या तणावामुळे झालेल्या प्रत्येक मृत्यूला आपोआप भरपाई मिळत नाही. काम आणि मृत्यू यांच्यातील संबंध सिद्ध करणे आवश्यक आहे.
