तामिळनाडूमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा मोठा फटका देशातील पोल्ट्री उद्योगाला बसत आहे. या आजारामुळे अंड्यांच्या निर्यातीवर परिणाम झाला असून, देशांतर्गत बाजारपेठेत अंड्यांच्या दरात सुमारे २० टक्क्यांची घसरण झाली आहे. निर्यातीसाठी पाठवण्यात येणारा माल अडकू लागल्याने बाजारात अंड्यांचा अतिरिक्त साठा निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम उत्पादकांच्या उत्पन्नावर होत असून पोल्ट्री व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
तामिळनाडूतील नमक्कल हे देशातील अंडी उत्पादन आणि निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र आहे. ११ नोव्हेंबर रोजी येथे अंड्यांचा दर प्रति नग ६.७० रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र, १३ नोव्हेंबर रोजी कुड्डालोर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव निश्चित झाल्यानंतर दरात घसरण सुरू झाली. नमक्कलमधील अंड्यांचा दर ५.६० रुपयांपर्यंत खाली आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्येही अंड्यांच्या दरात ६ ते १० टक्क्यांची घट झाली आहे. भारताच्या एकूण अंडी निर्यातीपैकी ९० टक्क्यांहून अधिक निर्यात नमक्कलमधून होत असल्याने या भागातील परिस्थितीचा देशभरातील बाजारपेठेवर परिणाम होत आहे.
हे ही वाचा:
कच्च्या तेलाच्या दरात ९० दिवसांतील नीचांकी घसरण
पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखांवरून सोनियांना कायदेशीर नोटीस
पहलगाम हल्ल्यापूर्वी काश्मीरवर चिनी उपग्रहांची नजर?
मेरठमधून दहशतवादी कनेक्शन असलेल्या उजैदला अटक
अंड्यांच्या दरातील घसरणीमागे केवळ बर्ड फ्लू हे एकमेव कारण नाही. दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात मांसाहाराचे सेवन कमी होत असल्याने अंड्यांची मागणीही घटली आहे. दुसरीकडे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. पोल्ट्री खाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मक्याच्या किमती वर्षभरात सुमारे ५० टक्क्यांनी, तर सोयाबीन पेंडच्या किमती ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे विक्रीदर कमी आणि उत्पादन खर्च जास्त अशा दुहेरी संकटात पोल्ट्री व्यावसायिक सापडले आहेत.
हिवाळ्यात अंडी आणि चिकनची मागणी वाढेल, या अपेक्षेने उत्पादकांनी उत्पादनाचे नियोजन केले होते. मात्र, बर्ड फ्लू आणि निर्यातीतील अडथळ्यांमुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. चिकन उत्पादनाचा खर्च प्रतिकिलो १२० रुपयांपेक्षा अधिक असताना उत्पादकांना सुमारे ८० रुपयेच मिळत असल्याचे उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी म्हटले आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त अंडी मिळण्याची शक्यता असली, तरी पोल्ट्री उद्योगासाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे. निर्यात पूर्ववत होणे आणि बाजारातील मागणी वाढणे हेच आता या उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
