घरविशेषचीनच्या अंतराळ मोहिमेत पाकिस्तानी अंतराळवीराचा सहभाग

चीनच्या अंतराळ मोहिमेत पाकिस्तानी अंतराळवीराचा सहभाग

तियांगोंग अंतराळ स्थानकावर आठवडाभर मुक्काम

चीनने बुधवारी (२५ नोव्हेंबर) शेनझोऊ-२४ या मानवयुक्त अंतराळयानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या मोहिमेत दोन चिनी अंतराळवीरांसह पाकिस्तानचा मोहम्मद झीशान अली सहभागी झाला आहे. यामुळे या मोहिमेकडे भारतासह जगाचे लक्ष असणार आहे. चीनच्या मानवयुक्त अंतराळ कार्यक्रमात सहभागी होणारा आणि चीनच्या तियांगोंग अंतराळ स्थानकावर पोहोचणारा तो पहिला परदेशी अंतराळवीर ठरला आहे. त्यामुळे चीन-पाकिस्तान अंतराळ सहकार्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

चीनच्या वायव्येकडील जिउक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून लॉन्ग मार्च-२एफ या प्रक्षेपकाच्या साहाय्याने शेनझोऊ-२४ अंतराळयानाने अवकाशात झेप घेतली. प्रक्षेपणानंतर काही मिनिटांतच यानाने नियोजित कक्षेत प्रवेश केल्याची माहिती चिनी अधिकाऱ्यांनी दिली. या मोहिमेचे नेतृत्व तांग होंगबो करत असून वू यी हे फ्लाइट इंजिनिअर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तर पाकिस्तानचा ४० वर्षीय माजी हवाई दल वैमानिक झीशान अली पेलोड स्पेशालिस्ट म्हणून सहभागी झाला आहे.

अली अंतराळात सुमारे आठवडाभर राहणार असून विविध वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सहभागी होणार आहे. या मोहिमेत ९० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग आणि तंत्रज्ञान चाचण्या करण्याचे नियोजन आहे. जैवतंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि अंतराळ वैद्यकशास्त्र अशा क्षेत्रांमध्ये हे प्रयोग केले जाणार आहेत. त्यानंतर अली शेनझोऊ-२३ यानातून पृथ्वीवर परतणार आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेचा भारतासह १६ देशांना टॅरिफचा इशारा

दिल्लीतील कॅफेमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

विक्रोळीत घरात घुसून अतिप्रसंग करू पाहणाऱ्या अनासला चोप

अरुणाचल सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये दहा दिवस चर्चा

विशेष म्हणजे, चीन आणि पाकिस्तान यांच्यात फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या अंतराळ सहकार्य कराराचा हा भाग आहे. अलीने या मोहिमेसाठी बीजिंगमध्ये सात महिने प्रशिक्षण घेतले. यात अंतराळ तंत्रज्ञानासोबतच चिनी भाषेचे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले. चीनने २०२२ मध्ये तियांगोंग अंतराळ स्थानक कार्यान्वित केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून (आयएसएस) वेगळे असलेले हे स्थानक आता आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी खुले करण्याच्या दिशेने चीन प्रयत्न करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version