श्रीलंका महिला क्रिकेट संघाने आयर्लंडचा ६ विकेट्सनी पराभव करत आयसीसी महिला इमर्जिंग नेशन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने आयर्लंडचे ९७ धावांचे आव्हान अवघ्या १२.४ षटकांत पूर्ण केले. ४४ चेंडू राखून मिळवलेल्या या विजयासह श्रीलंकेने दुसऱ्या आवृत्तीच्या स्पर्धेवर आपले नाव कोरले.
नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या भेदक गोलंदाजीसमोर आयर्लंडचा डाव १९.३ षटकांत अवघ्या ९६ धावांत आटोपला. अलाना डलझेलने सर्वाधिक २४ धावा केल्या. लुसी लिटलने १५, जॉर्जिना डिम्प्सीने १३, तर एमी हंटरने १० धावांचे योगदान दिले.
श्रीलंकेकडून सत्या संदीपनीने शानदार गोलंदाजी करत ४ षटकांत अवघ्या १३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. चेथना, सुगंधिका, निमाशा आणि कविशा यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.
प्रत्युत्तरात श्रीलंकेने १२.४ षटकांत ४ विकेट्स गमावत ९९ धावा करून सहज विजय मिळवला. इमेशा दुलानीने २५ चेंडूंत नाबाद ४४ धावांची आक्रमक खेळी केली. तिच्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. संजना काविंदीने २२ चेंडूंत २५ धावा केल्या, तर कविशा दिलहारीने १० चेंडूंत नाबाद १६ धावा केल्या.
आयरलंडकडून किया मॅक्कार्थी आणि कारा मरे यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेची विश्मी गुणरत्ने हिला मालिकावीर, तर सत्या संदीपनी हिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
दरम्यान, महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उदयोन्मुख संघांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभव मिळवून देण्यासाठी आयसीसीने नोव्हेंबर २०२५ मध्ये या टी-२० स्पर्धेची सुरुवात केली. पहिल्या आवृत्तीत थायलंडने विजेतेपद पटकावले होते. यंदा श्रीलंकेने विजेतेपदावर आपले नाव कोरले.
