उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि समाजवादी पक्ष (सपा) यांच्यातील जागावाटपाचा वाद आता उघडपणे समोर आला आहे. समाजवादी पक्षाने काँग्रेसला २६ जागांचा प्रस्ताव दिल्याने आधीच नाराज असलेल्या काँग्रेसची अखिलेश यादव यांच्या पक्षाने पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर अधिकच नाराजी वाढली आहे. काँग्रेसने समाजवादी पक्षाच्या या निर्णयाला एकतर्फी कारवाई म्हटले असून, त्यामुळे दोन्ही पक्षांमधील युतीच्या चर्चेत तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षात उत्तर प्रदेश निवडणुकीच्या अनुषंगाने आघाडी होणार असल्याचो म्हटले जात असताना समाजवादी पार्टीकडून मात्र उमेदवारांची यादी जाहीर होते, काँग्रेसला किती जागा देणार याविषयी सांगितले जाते त्यामुळे नाराजी वाढली आहे.
मंगळवारी जागावाटपाबाबत झालेल्या चर्चेदरम्यान समाजवादी पक्षाने काँग्रेसला विजयाची शक्यता असलेल्या २६ मतदारसंघांचा प्रस्ताव दिला होता. काँग्रेसने सुरुवातीला उत्तर प्रदेशातील एकूण ४०३ जागांपैकी १७० ते १८० जागांची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर ही मागणी कमी करून सुमारे १३० जागांवर आणली. जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच समाजवादी पक्षाने पाच मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील दोन जागांचाही समावेश आहे. त्यामुळे काँग्रेसची नाराजी आणखी वाढली.
सहारनपूर जिल्ह्यातील बेहट आणि सहारनपूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसची नजर होती. काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि सहारनपूरचे खासदार इमरान मसूद हे या जागांसाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही जागांवर समाजवादी पक्षाने विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती आणि दोन्ही मतदारसंघांत काँग्रेसला प्रत्येकी केवळ २,८०० हून अधिक मते मिळाली होती.
हे ही वाचा:
गिल-जायस्वालची भरारी, बुमराहची दुसऱ्या स्थानी स्वारी!
दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण!
चीनच्या अंतराळ मोहिमेत पाकिस्तानी अंतराळवीराचा सहभाग
बर्ड फ्लूचा पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका
इमरान मसूद हे सहारनपूरचे लोकसभा खासदार आहेत. या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे. उत्तर प्रदेशात पक्षाची राजकीय ताकद पुन्हा वाढवण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून काँग्रेस या मतदारसंघांकडे पाहत आहे. या वादावर मसूद म्हणाले की, ‘आम्ही कोणाकडे काही मागण्यासाठी गेलेलो नाही. आम्ही काही भिकारी नाही.
जागावाटपाची चर्चा अंतिम होण्यापूर्वीच समाजवादी पक्षाने उमेदवार जाहीर केल्याने इमरान मसूद यांनी नाराजी व्यक्त केली. या निर्णयामुळे युतीबाबत समाजवादी पक्ष किती गंभीर आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत मसूद यांनी सांगितले की, समाजवादी पक्षाच्या अशा निर्णयांचा फायदा केवळ भाजपला होणार आहे. स्वतःच्या मित्रपक्षांशी लढून तुम्हाला काय मिळणार आहे? याचा फायदा भाजपला होत आहे. ही युती म्हणावी अशी परिस्थिती नाही. युतीमध्ये भागीदार असतात, याचक नसतात. आम्ही कोणाकडे काही मागण्यासाठी गेलेलो नाही.
समाजवादी पक्षाने २६ जागांचा प्रस्ताव दिला, त्यापूर्वी काँग्रेसने अधिकृतपणे कोणत्याही जागांची मागणीही केली नव्हती, असेही मसूद यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपनेही काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील या मतभेदांवरून दोन्ही पक्षांना लक्ष्य केले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सपा-काँग्रेस युतीला ‘ठगबंधन’ असे संबोधले. तर भाजप आमदार राजेश्वर सिंह यांनी काँग्रेसची अवस्था हसण्याचा विषय झाल्याची टीका केली.
इमरान मसूद यांनी अप्रत्यक्षपणे अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधताना राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे समर्थन केले. ते म्हणाले, “भाजपला राष्ट्रीय स्तरावर आव्हान देण्याची क्षमता केवळ राहुल गांधी यांच्यात आहे. देशात त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही हे करू शकत नाही.”
काँग्रेसकडेही उमेदवारांची यादी तयार असल्याचे सांगत, मात्र युतीच्या हितासाठी पक्षाने अद्याप ती जाहीर केलेली नसल्याचे मसूद यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमधील वाढती नाराजी लक्षात घेऊन अखिलेश यादव यांनी मंगळवारी खुले पत्र प्रसिद्ध केले. दोन्ही मित्रपक्षांमध्ये समन्वय वाढवून जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी या पत्रातून केला.
