घरस्पोर्ट्सदुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण!

दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण!

दुसऱ्याला उपदेश करणे सोपे असते; मात्र स्वतःच्या वर्तनाचा विसर पडला की त्याला दुटप्पीपणाच म्हणावे लागते! पाकिस्तान ए संघाविरुद्धच्या सामन्यात आक्रमक वर्तन केल्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्यावर माजी फिरकीपटू हरभजन सिंह याने टीका केली आहे. खेळाडूंचे असे वर्तन नव्या पिढीसाठी चुकीचा आदर्श ठरते, असे हरभजनचे म्हणणे आहे. मात्र, हरभजननेच आयपीएलच्या पहिल्या पर्वात श्रीशांतच्या कानशिलात लगावल्याचा वादग्रस्त प्रसंग क्रिकेटविश्व विसरलेले नाही. त्यामुळे हरभजनच्या या उपदेशावरून त्याच्या जुन्या कृतीची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.

पाकिस्तान ए विरुद्धच्या सामन्यात हर्षित राणा आक्रमक दिसला होता. त्याने अपशब्दांचा वापर केल्याचेही पाहायला मिळाले. यावर प्रतिक्रिया देताना हरभजनने त्याच्या वर्तनाला चुकीचे ठरवले. खेळाडूंनी मर्यादा ओलांडू नयेत. अशा प्रकारांमुळे नव्या पिढीसमोर चुकीचा आदर्श निर्माण होतो, असे त्याने म्हटले.

मात्र, हरभजनचा हा सल्ला ऐकताना २००८ मधील आयपीएलचा पहिला हंगाम आठवतो. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यानंतर हरभजनने श्रीशांतच्या कानशिलात लगावली होती. या घटनेने क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली होती. श्रीशांत मैदानावरच रडताना दिसला होता. या प्रकरणी हरभजनवर उर्वरित आयपीएल सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती.

हरभजनच्या कारकिर्दीतील वादग्रस्त प्रसंग केवळ श्रीशांतपुरते मर्यादित नाहीत. २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीदरम्यान अँड्र्यू सायमंड्ससोबतही त्याचा मोठा वाद झाला होता. सायमंड्सने हरभजनवर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी चर्चा झाली. सुरुवातीला हरभजनवर तीन कसोटी सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. मात्र, अपील प्रक्रियेनंतर हा निर्णय बदलण्यात आला आणि त्याला दंड ठोठावण्यात आला.

हेही वाचा :

अमेरिकेला ८,६०६ टन साखर निर्यातीसाठी भारताची मंजुरी

हिंदी महासागर देशांमधील दुवा ठरावा!

ऑक्टोबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ९ टक्क्यांनी झेप

पाकिस्तानातून दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या जम्मू-काश्मिरातील जमिनी जप्त

आज हर्षित राणाच्या आक्रमक वर्तनावर बोट ठेवणाऱ्या हरभजनने स्वतःच्या कारकिर्दीतील या प्रसंगांकडेही पाहण्याची गरज आहे. खेळात आक्रमकता असावी; मात्र तिचे रूपांतर गैरवर्तनात होता कामा नये, हा हरभजनचा मुद्दा योग्य असला तरी तोच निकष प्रत्येक खेळाडूला आणि स्वतःलाही लागू होतो, हे विसरून चालणार नाही.

खेळात थोडीफार आक्रमकता आणि हास्यविनोद असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे सामन्यात रंगतही येते. मात्र, आक्रमकता मर्यादेपलीकडे जाता कामा नये, असे हरभजनने म्हटले आहे. त्याचवेळी दुसऱ्याला शिस्तीचे धडे देताना स्वतःच्या वर्तनाचाही हिशेब द्यावा लागतो, अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version