तामिळनाडूतील कार्तिगाई दीपम प्रज्वलनावरून सुरू असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मदुराई येथील थिरुपरंकुंद्रम टेकडीवरील दीपथून या स्तंभाजवळ दिवा प्रज्वलित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. मात्र, २४ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी दिवा लावण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी निशाणा साधत घटनात्मक अधिकारांचा हा सर्वात मोठा अवमान असल्याची टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, तामिळनाडूतील द्रमुक सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करून घटनात्मक अधिकारांचा अवमान केला आहे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त २४ नोव्हेंबर रोजी काही अटींच्या अधीन राहून दीपथून येथे एकदाच कार्तिगाई दीपम प्रज्वलित करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. मात्र, राज्य सरकारने या आदेशाची अंमलबजावणी केली नाही, असा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “राहुल गांधी आणि इंडी आघाडीचे नेते वारंवार संविधानाचा उल्लेख करतात. मात्र, संविधानाचे रक्षण करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची वेळ येते, तेव्हा ते त्याकडे दुर्लक्ष करतात. संविधानाचे स्वयंघोषित रक्षक असलेल्यांकडून झालेला हा घटनात्मक अवमानाचा गंभीर प्रकार आहे.”
दरम्यान, या प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मदुराईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केलेल्या स्थिती अहवालात दीपथून येथे दिवा प्रज्वलित होऊ शकला नसल्याचे सांगितले. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या आदेशाचे जाणीवपूर्वक पालन न केल्याचा आरोप केला आणि न्यायालयाने स्वतःहून अवमानाची कारवाई सुरू करावी, अशी मागणी केली. मात्र, न्यायालयाने स्वतःहून अवमानाची कारवाई करण्यास नकार दिला. संबंधित पक्षांनी यासाठी स्वतंत्र अवमान याचिका दाखल करावी. त्यावर सुनावणी करून योग्य आदेश दिले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
हे ही वाचा:
पाकिस्तानातून दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या जम्मू-काश्मिरातील जमिनी जप्त
अमेठीत ख्रिस्ती धर्मांतर करणाऱ्या १० जणांच्या टोळक्याला अटक
होर्मुझच्या सामुद्रधुनीत चार तेलवाहू जहाजांना आग
चीनच्या अंतराळ मोहिमेत पाकिस्तानी अंतराळवीराचा सहभाग
नेमका वाद काय?
मदुराईतील थिरुपरंकुंद्रम टेकडीवर असलेल्या मंदिराच्या पारंपरिक दीपमंडपात अनेक वर्षांपासून कार्तिगाई दीपमचा दिवा लावला जातो. मात्र, हिंदू संघटनांनी टेकडीवरील दीपथून या दगडी स्तंभाजवळ दिवा लावण्याची मागणी केली आहे. हा स्तंभ दर्ग्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर आहे. २० नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने २४ नोव्हेंबरला एकदाच दीपथून येथे दिवा लावण्याची परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात पारंपरिक ठिकाणीच दिवा लावण्यात आला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाच्या पालनावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
