काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे गटाच्या सहा प्रवक्त्यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती फाडून निषेध व्यक्त केला. तसेच या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य करण्यात आले.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम, शीतल म्हात्रे, संजना घाडी, शायना एनसी, आनंद दुबे आणि सुशिबेन शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील २०१ व्या पानावर सावरकर ब्रिटिश सरकारकडे सातत्याने माफी मागत होते, असा उल्लेख असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्यांनी केला. सावरकरांच्या कार्याचा आणि बलिदानाचा अशा प्रकारे अपमान करणे सहन केले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. पुस्तकात सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधात चुकीचे कथन पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
हे ही वाचा:
जावेद अख्तर म्हणतात, प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम
राहुल गांधी अमेरिकेत पुन्हा बरळले
मुंबई विमानतळावर स्पाईसजेटचे शेकडो प्रवासी अडकले
यावेळी शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचे पुस्तक स्वीकारले असेल, तर सावरकरांविषयीच्या कथित उल्लेखांवर त्यांची भूमिका काय आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला. सावरकरांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी करणारे उद्धव ठाकरे आता या मुद्द्यावर आवाज उठवणार का, असा प्रश्नही प्रवक्त्यांनी विचारला. सोनिया गांधी यांनी या कथित विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली.
