घरराजकारणतूर्तास देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही - जयंत पाटील

तूर्तास देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही – जयंत पाटील

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप झाल्यानंतर राज्यभर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात चेंडू टोलवला. पण राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

शनिवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ह्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पत्र लिहिले. या पत्रात सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे ह्याला दर महिन्याला १०० कोटी पोहोचवण्याचे आदेश गृहमंत्र्यानी दिल्याचा धक्कादायक आरोप या पत्रात केला आहे. या पत्रानंतर देशात एकच खळबळ उडाली. या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अनिल देशमुख ह्यांच्या बाबतीत सहकाऱ्यांशी चर्चा करून उद्यापर्यंत निर्णय घेऊ असे सांगितले.

हे ही वाचा:

६ जनपथवर पवार-राऊतांची खलबते

‘धनानंदां’च्या कचाट्यातून सुटकेसाठी धडपडणारा महाराष्ट्र

मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपींना ३० मार्चपर्यंत एटीएस कोठडी

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

रविवारी शरद पवार यांनी आपल्या दिल्ली येथील निवासस्थानी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. त्याच वेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते कमलनाथ हे देखील पवार यांच्या भेटीला दाखल झाले. तब्बल दोन तास चाललेली ही बैठक संपल्यावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांच्यासोबत मंगळवेढा पोटनिवडुणकी संदर्भात चर्चा झाल्याचे पाटील यांनी माध्यमांना सांगितले.

अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन ह्यांची हत्या या दोन्ही प्रकरणांचा तपास एटीएस आणि एनआयए करत आहेत. त्यामुळे हा तपास झाल्यावर सत्य काय ते समोर येईल असे पाटील म्हणाले. परमबीर सिंह यांनी बदली झाल्यावर हे आरोप केले आहेत असेही ते म्हणाले. त्यामुळे तूर्तास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांवर आरोप झाले पण त्यांनी कोणाचाही राजीनामा घेतला नाही असे म्हणत जयंत पाटील यांनी विरोधकांकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version