भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळीचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानविरुद्ध केलेल्या १८३ धावा, श्रीलंकेविरुद्धची नाबाद १३३ धावांची खेळी किंवा विश्वचषकातील महत्त्वपूर्ण खेळी नव्हे, तर २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध केलेल्या ४३ धावांच्या खेळीला विराटने सर्वोत्तम ठरवले आहे. आपल्या ३८ व्या वाढदिवसानिमित्त स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने ही आठवण सांगितली.
२०१३ मध्ये एजबॅस्टन येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रंगला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी २० षटकांचा खेळवण्यात आला. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. अशा परिस्थितीत विराटने जबाबदारीने फलंदाजी करत ३४ चेंडूंत ४३ धावा केल्या. त्याच्या खेळीत १ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. शिखर धवनसोबत त्याने ४१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
विराटच्या या खेळीमुळे भारताला २० षटकांत ७ बाद १२९ धावांपर्यंत मजल मारता आली. रवींद्र जडेजानेही ३३ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १२४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताने हा सामना ५ धावांनी जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला.
विराटच्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय खेळी आहेत. २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध केलेल्या १८३ धावा, श्रीलंकेविरुद्ध झळकावलेली नाबाद १३३ धावा आणि २०२३ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या ८५ धावांची खेळी यांचा त्यात समावेश आहे. मात्र, या सर्व खेळींना मागे टाकत त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील ४३ धावांच्या खेळीला पसंती दिली. सुरुवातीला २०११ च्या विश्वचषक अंतिम सामन्यातील ३५ धावांची खेळीही त्याच्या पसंतीत होती; मात्र अखेरीस त्याने २०१३ च्या फायनलची निवड केली.
