अमेरिकेतील २०२६ च्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा फटका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता आर्थिक पातळीवरही बसला आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेट आणि प्रतिनिधीगृह या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळवल्यानंतर अमेरिकेतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या निकालांचे पडसाद शेअर बाजारात उमटले असून, ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली आहे. परिणामी, अवघ्या एका दिवसात ट्रम्प यांच्या संपत्तीत सुमारे ७३ दशलक्ष डॉलर म्हणजेच ६४६ कोटी रुपयांची घट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या घसरणीमागे ट्रम्प यांच्या मालकीशी संबंधित ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप या कंपनीच्या शेअर्समधील पडझड हे प्रमुख कारण आहे. ही कंपनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी आहे. मध्यावधी निवडणुकीच्या निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात ११ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. समभागाचा भाव ५.२३ डॉलर या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. ट्रम्प यांचा या कंपनीत सुमारे ४१ टक्के हिस्सा असल्याने शेअरच्या घसरणीचा थेट परिणाम त्यांच्या संपत्तीच्या मूल्यावर झाला आहे.
हे ही वाचा:
रिपब्लिकन पक्षाच्या पराभवामुळे व्यापार करारात भारताची बाजू मजबूत होणार?
दिल्लीत बांधकामाधीन इमारत कोसळून दोघांचा मृत्यू
अमेरिकेतील निवडणुकीनंतर कच्च्या तेलाच्या दरात १० टक्क्यांची घसरण
दिल्लीमध्ये हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने ५०० चा टप्पा ओलांडला
विशेष म्हणजे, ट्रम्प मीडिया कंपनीची आर्थिक स्थिती आधीपासूनच अडचणीची आहे. २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने २३८.१ दशलक्ष डॉलरचा निव्वळ तोटा नोंदवला, तर याच काळात कंपनीचा महसूल केवळ १.७ दशलक्ष डॉलर होता. कंपनीच्या डिजिटल मालमत्तेच्या मूल्यामधील घसरण आणि कायदेशीर खर्चामुळे तोटा वाढल्याचे सांगितले जाते. याशिवाय ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मवरील वेब ट्रॅफिकमध्येही वार्षिक आधारावर सुमारे ३० टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे कंपनीसमोरील व्यावसायिक आव्हाने अधिक तीव्र झाली आहेत.
दरम्यान, ट्रम्प कुटुंबाशी संबंधित वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल या क्रिप्टो उपक्रमातील डिजिटल टोकन्सच्या किमतींवरही दबाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांचे प्रमुख समर्थक इलॉन मस्क यांच्या टेस्ला आणि स्पेसएक्सशी संबंधित समभागांमध्येही घसरण नोंदवण्यात आली. मात्र, या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रमुख शेअर निर्देशांकांनी तेजी नोंदवली. त्यामुळे ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांमधील घसरण आणि एकूण बाजारातील तेजी असे परस्परविरोधी चित्र पाहायला मिळाले.
