घरविशेषदिल्लीमध्ये हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने ५०० चा टप्पा ओलांडला

दिल्लीमध्ये हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने ५०० चा टप्पा ओलांडला

दिवाळीआधीच राजधानीत हवेची गुणवत्ता खालावली

दिल्लीतील वायुप्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, गुरुवारी (५ नोव्हेंबर) सकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ५१० वर पोहोचला. आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत प्रदूषणात सातत्याने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, दिवाळीला अद्याप काही दिवस बाकी असतानाच राजधानीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी प्रदूषणाचा स्तर दिवसभराच्या तुलनेत अधिक वाढत असल्याचेही दिसून येत आहे. दिल्लीचा दैनंदिन सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३ नोव्हेंबरला ४१० होता. ४ नोव्हेंबरला तो ४९३ वर पोहोचला, तर ५ नोव्हेंबरला सकाळी ५१० नोंदवण्यात आला. त्यामुळे रात्रीच्या वेळी नेमके प्रदूषण वाढते तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिवसा सूर्यप्रकाशामुळे जमीन तापते आणि तिच्या संपर्कातील हवाही उष्ण होते. ही उष्ण हवा वरच्या दिशेने जाते. त्यामुळे वाहनांचा धूर, धूळ आणि इतर प्रदूषक हवेत वरच्या स्तरांपर्यंत पसरतात. दिवसा वाऱ्याचा वेग तुलनेने अधिक असल्याने प्रदूषक विखुरण्यासही मदत होते. मात्र, सूर्यास्तानंतर जमीन थंड होऊ लागते. जमिनीलगतची हवा वरच्या हवेपेक्षा अधिक थंड होते. या स्थितीला ‘तापमान व्युत्क्रमण’ (Temperature Inversion) म्हणतात. त्यामुळे थंड हवा वर न जाता जमिनीलगतच अडकून राहते. परिणामी वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक धूर आणि बांधकामांमधील धूळ यांसारखे प्रदूषक हवेत वर पसरू शकत नाहीत आणि जमिनीजवळच साचतात.

रात्री वातावरण स्थिर असते आणि वाऱ्याचा वेगही कमी असतो. यामुळे प्रदूषक हवेत मिसळण्याची प्रक्रिया मंदावते. पहाटे सूर्य उगवण्यापूर्वी तापमान व्युत्क्रमणाचा प्रभाव अधिक तीव्र असतो. त्यामुळे वाहनांची वर्दळ तुलनेने कमी असली तरी प्रदूषणाची पातळी अधिक नोंदवली जाऊ शकते.

हे ही वाचा:

इंडी आघाडीच्या रॅलीचा व्यापाराला फटका; देशव्यापी ‘धिक्कार दिन’ पाळणार

इराणला तेल निर्यातीत मदत केल्याप्रकरणी भारतीय दाम्पत्यावर निर्बंध

अग्निवीरांचा सेवाकाळ चार वरून सहा वर्षे!

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील ‘एम’ फॅक्टर

दिल्लीतील प्रदूषणामागे केवळ हवामान कारणीभूत नाही. वाहनांचा धूर, रस्त्यांवरील धूळ, बांधकामे, औद्योगिक उत्सर्जन आणि शेजारील राज्यांमध्ये जाळण्यात येणारे पीक अवशेष यांचाही त्यात वाटा आहे. दरम्यान, ८ नोव्हेंबरला दिवाळी साजरी होणार आहे. अशा वेळी फटाक्यांच्या धुरामुळे आधीच प्रदूषित असलेल्या हवेत आणखी सूक्ष्म कण मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाची समस्या आणखी गंभीर होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version