घरदेश दुनियाइराणला तेल निर्यातीत मदत केल्याप्रकरणी भारतीय दाम्पत्यावर निर्बंध

इराणला तेल निर्यातीत मदत केल्याप्रकरणी भारतीय दाम्पत्यावर निर्बंध

अमेरिकेची नऊ कंपन्यांवरही कारवाई

अमेरिकेने इराणच्या तेल निर्यातीवरील निर्बंध चुकवण्यास मदत केल्याच्या आरोपावरून भारतीय व्यावसायिक सुनील कुमार शर्मा आणि त्यांच्या पत्नी जसप्रीत प्रीती शाहिद यांच्यावर कारवाई केली आहे. याशिवाय भारताशी संबंधित नऊ कंपन्या आणि अन्य दोन भारतीय नागरिकांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने ४ नोव्हेंबर रोजी ही घोषणा केली.

चंदीगडमधील शर्मा दाम्पत्याने इराणचे तेल वाहून नेणाऱ्या जहाजांना बनावट नोंदणी आणि सागरी प्रमाणपत्रे उपलब्ध करून दिल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. अश्वनी कुमार धीमान आणि इश्विंदर सिंह या अन्य दोन भारतीय नागरिकांचाही निर्बंधित व्यक्तींमध्ये समावेश आहे.

अमेरिकेच्या दाव्यानुसार, शर्मा आणि शाहिद यांनी २०१४ पासून विविध देशांच्या सागरी नियामक संस्थांच्या नावाने वेबसाइट आणि संस्था उभारल्या होत्या. गयाना, अरुबा, निकाराग्वा आणि सिंट मार्टेन यांसारख्या देशांच्या नावाने जहाज नोंदणी आणि प्रमाणपत्रे देण्याची व्यवस्था तयार करण्यात आली होती. मात्र, संबंधित देशांच्या सरकारांनी त्यांना अधिकृत मान्यता दिलेली नव्हती.

जहाज कोणत्या देशाच्या ध्वजाखाली प्रवास करते, यावर त्याची नोंदणी आणि नियामक देखरेख अवलंबून असते. बनावट ध्वज आणि प्रमाणपत्रांच्या माध्यमातून जहाजांची खरी ओळख लपवता येते. याच व्यवस्थेचा वापर करून इराणच्या तेल वाहतुकीला मदत केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

अग्निवीरांचा सेवाकाळ चार वरून सहा वर्षे!

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील ‘एम’ फॅक्टर

ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी यांचे निधन

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत भारतीय वंशाच्या नेत्यांची विजयी हॅट्ट्रिक

२०२३ मध्ये शर्माने सिंगापूरमध्ये ‘एस्वातिनी मेरीटाइम अफेअर्स अँड इंटरनॅशनल शिप रजिस्ट्री’ ही कंपनी स्थापन केली होती. मात्र, एस्वातिनी सरकारने या संस्थेला मान्यता नसल्याचे स्पष्ट केले होते.

या कारवाईत संबंधित व्यक्ती आणि कंपन्यांची अमेरिकेतील मालमत्ता गोठवली जाणार असून, अमेरिकन नागरिक आणि कंपन्यांना त्यांच्याशी व्यवहार करता येणार नाही. ट्रम्प प्रशासनाच्या ‘ऑपरेशन इकॉनॉमिक आउटकास्ट’ मोहिमेअंतर्गत इराणच्या तेल व्यापाराला आर्थिक मदत करणाऱ्या नेटवर्कवर ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version