ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी यांचे बुधवारी (४ नोव्हेंबर) मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
शेखर जोशी यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र समूहात अनेक वर्षे पत्रकारिता केली होती. त्यांनी डोंबिवली विभागाचे प्रतिनिधी म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर ते ‘लोकसत्ता’मध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी साहित्यिक आणि सांस्कृतिक विषयांचे वार्तांकन केले. अखिल भारतीय साहित्य संमेलने, नाट्य संमेलने यांसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले होते. सामाजिक आणि नागरी समस्यांवर सडेतोड लिखाण करणे हे त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य होते. कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा प्रवाशांना मीटरप्रमाणे प्रवास करता यावा, यासाठी त्यांनी तब्बल २५ वर्षे वृत्तांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. त्यांच्या लिखाणाची दखल घेत परिवहन विभागाने या भागात मीटरप्रमाणे रिक्षा वाहतुकीला सुरुवात केली होती.
हे ही वाचा:
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत भारतीय वंशाच्या नेत्यांची विजयी हॅट्ट्रिक
बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांच्याविरोधात गुन्हा
‘चलो दिल्ली’ रॅलीला दांडी मारणारे काँग्रेसचे ८३ पदाधिकारी निलंबित
“मी निवडणूक लढवली असती, तर रिपब्लिकन पक्ष जिंकला असता”
वाहतूक कोंडी, रिक्षा वाहनतळ, रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा प्रश्न अशा नागरी समस्यांवरही ते सातत्याने आवाज उठवत होते. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी ‘शेजो’ या नावाने समाजमाध्यमांतून लेखन सुरू ठेवले. स्थानिक समस्यांसोबतच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि विद्यार्थ्यांनाही त्यांनी आपल्या लेखनातून प्रसिद्धी दिली.
