राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील रेल्वे रुळावर स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अनुपगड ते बठिंडा दरम्यान धावणाऱ्या रेल्वेला ’50 जीबी’जवळ मंगळवारी रात्री लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. विशेष म्हणजे या रुळावरून नेमकीच एक रेल्वे धावली. त्यानंतर हा स्फोट झाला.
अनुपगडहून सूरतगडकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन रात्री 9 वाजेच्या सुमारास या ट्रॅकवरून सुरक्षित निघून गेली होती. परंतु, ट्रेन निघून गेल्याच्या अवघ्या 45 मिनिटांनी त्याच ट्रॅकवर हा थरारक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज सुमारे 200 मीटर परिसरापर्यंत ऐकू आला. तर रेल्वे रुळावर 2 फूट खोल खड्डा पडला असून रुळाचे क्लिप्सही निखळले ज्यामुळे रेल्वे रुळाचे मोठे नुकसान झाले आहे.
इतकचं नव्हे तर हा स्फोट इतका तीव्र होता की रेल्वे रुळाखालील सिमेंटचे दोन ते तीन स्लीपर पिलर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. स्फोटानंतर या रेल्वे मार्गावरील सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. दिवाळीपूर्वीच मोठा घातपात घडवण्याचा हा डाव असल्याचे समोर येत आहे. दरम्यान या भीषण स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. त्यांनी तातडीने यंत्रणांना याविषयीची माहिती दिली.
हे ही वाचा:
मानहानीच्या दाव्यात लेखी उत्तरासाठी ठाकरे पिता-पुत्रांना मुदतवाढ नाही
बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांच्याविरोधात गुन्हा
‘चलो दिल्ली’ रॅलीला दांडी मारणारे काँग्रेसचे ८३ पदाधिकारी निलंबित
“मी निवडणूक लढवली असती, तर रिपब्लिकन पक्ष जिंकला असता”
घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा आणि रेल्वे सुरक्षा दल, गुप्तचर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. तसेच या प्रकारामागे नेमकं कोण आहे आणि यामागचा उद्देश काय होता, याचा शोध घेतला जात आहे.
