रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांचा भारतविरोधी वक्तव्ये करत असल्याचा कथित बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ डिजिटल पद्धतीने छेडछाड करून तयार करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने ही कारवाई केली.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी सायबर पेट्रोलिंगदरम्यान ‘द कोट्स न्यूज’ या सोशल मीडिया हँडलवरून प्रशांत भूषण यांच्या ‘एक्स’ खात्यावरून लावरोव्ह यांचा कथित बनावट व्हिडिओ शेअर केल्याचा दावा करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या व्हिडिओमध्ये लावरोव्ह भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयावर टीका करत असल्याचे दाखवण्यात आले होते.
या व्हिडिओसोबत प्रशांत भूषण यांनी, ‘रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताला जोरदार चपराक लगावली. जयशंकर रशियाला कोणता सल्ला देत होते?’ अशा आशयाची टिप्पणी केल्याचे वृत्त आहे. व्हिडिओमध्ये भारत हा रशियाचा केवळ व्यापारी भागीदार असून, त्यामुळे भारताला रशियाच्या परराष्ट्र धोरणात हस्तक्षेप करण्याचा किंवा रशिया-युक्रेन युद्धाबाबत सल्ला देण्याचा अधिकार मिळत नाही, असे लावरोव्ह म्हणत असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाच्या तथ्य पडताळणी विभागाने ३ नोव्हेंबर रोजी हा व्हिडिओ बनावट असल्याचे स्पष्ट केले.
हे ही वाचा:
‘चलो दिल्ली’ रॅलीला दांडी मारणारे काँग्रेसचे ८३ पदाधिकारी निलंबित
“मी निवडणूक लढवली असती, तर रिपब्लिकन पक्ष जिंकला असता”
अमेरिकन नागरिकांनी युद्धाला नाकारले!
मध्यावधी निवडणुकात ट्रम्प यांनी गमावले अनेक बालेकिल्ले
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम ३३६(४), ३५३(१)(क), ३५६ आणि ३४०(२), तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६सी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या भ्रामक, बदनामीकारक आणि चिथावणीखोर सामग्रीमुळे अफवा पसरू शकतात तसेच सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. सध्या विशेष कक्षाकडून व्हिडिओचा स्रोत आणि तो सोशल मीडियावर कशा प्रकारे प्रसारित झाला, याचा तपास सुरू आहे.
