महाराष्ट्र आणि डेन्मार्क यांच्यातील आर्थिक आणि औद्योगिक संबंधांना नवी गती मिळण्याची चिन्हे आहेत. डेन्मार्कचे उद्योगमंत्री मार्टिन लिडेगार्ड यांनी मुंबईला भेट देत राज्यातील गुंतवणुकीच्या संधींचा आढावा घेतला. सध्या महाराष्ट्रात डेन्मार्कच्या ६० हून अधिक कंपन्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. या भेटीदरम्यान ग्रीन शिपिंग, पर्यावरणपूरक वाहतूक, आधुनिक तंत्रज्ञान, व्यापार आणि औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
डेन्मार्कच्या कंपन्यांकडून महाराष्ट्रात होत असलेली गुंतवणूकही लक्षवेधी ठरत आहे. डेन्मार्कच्या नोव्होनेसीस कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये पाताळगंगा येथील उत्पादन प्रकल्पाच्या विस्तारासाठी ६०० दशलक्ष डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली. तसेच इम्पॅक्ट फंड डेन्मार्कने भारतातील इलेक्ट्रिक बस क्षेत्रातील ग्रीनसेल मोबिलिटीमध्ये २३० दशलक्ष डॅनिश क्रोनरची गुंतवणूक जाहीर केली आहे. डॅनफॉस, अल्फा लावल आणि हेम्पेल यांसारख्या कंपन्यांचीही महाराष्ट्रात उपस्थिती आहे.
हे ही वाचा:
भारतातील श्रीमंत करदात्यांची संख्या दुप्पट!
“मी निवडणूक लढवली असती, तर रिपब्लिकन पक्ष जिंकला असता”
अमेरिकन नागरिकांनी युद्धाला नाकारले!
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या नफ्यात २३ टक्क्यांची वाढ
या दौऱ्यात लार्सन अँड टुब्रोच्या (एल अँड टी) मुख्यालयातही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. विशेष म्हणजे, एल अँड टीची स्थापना १९३८ मध्ये मुंबईत डेन्मार्कच्या हेनिंग होल्क-लार्सन आणि सोरेन क्रिस्टियन टुब्रो या दोन अभियंत्यांनी केली होती. कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रह्मण्यन यांची मुंबईतील डेन्मार्कचे मानद वाणिज्यदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामुळे दोन्ही देशांतील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रातील समन्वय अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, २०२५ मध्ये डेन्मार्कच्या जहाजांनी भारतीय बंदरांवर ३ हजारांहून अधिक फेऱ्या केल्या. भारताला डेन्मार्ककडून वस्तू आणि सेवांची निर्यात २१.२ अब्ज डॅनिश क्रोनर इतकी होती. या पार्श्वभूमीवर बंदर विकास, हरित ऊर्जा, पर्यावरणपूरक जहाज वाहतूक आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. आगामी काळात या सहकार्याचे रूपांतर प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये झाल्यास राज्याच्या औद्योगिक विकासाला आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळू शकते.
