घरस्पोर्ट्सविराट, रोहित अन् गिल यांना ‘ऑल ब्लॅक्स’ची खास भेट!

विराट, रोहित अन् गिल यांना ‘ऑल ब्लॅक्स’ची खास भेट!

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील तीन दिग्गज खेळाडूंना खास भेट मिळाली. न्यूझीलंडचे माजी महान रग्बीपटू केविन मीलामू यांनी कर्णधार शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना वैयक्तिक क्रमांक असलेल्या ‘ऑल ब्लॅक्स’च्या जर्सी भेट दिल्या. ऑकलंडमधील ईडन पार्क येथे झालेल्या विशेष भेटीदरम्यान तिघांचेही ‘ऑल ब्लॅक्स’ परिवारात स्वागत करण्यात आले.

या भेटीत शुभमन गिलला ७७ क्रमांकाची, विराट कोहलीला १८ क्रमांकाची, तर रोहित शर्माला ४५ क्रमांकाची काळ्या रंगाची जर्सी देण्यात आली. भारतीय क्रिकेटपटूंच्या जर्सी क्रमांकानुसार ही भेट खास तयार करण्यात आली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियावर या खास क्षणाचे छायाचित्र आणि माहिती शेअर केली.

केविन मीलामू हे न्यूझीलंडच्या रग्बी इतिहासातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांनी तब्बल १३२ कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या ‘ऑल ब्लॅक्स’ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच २०११ आणि २०१५ मध्ये रग्बी विश्वचषक जिंकणाऱ्या न्यूझीलंड संघाचे ते सदस्य होते.

विशेष म्हणजे, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा संबंधांना यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. १९२६ मध्ये महान हॉकीपटू ध्यानचंद यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कराच्या हॉकी संघाने न्यूझीलंडचा ऐतिहासिक दौरा केला होता. या शताब्दी वर्षानिमित्त दोन्ही देशांमध्ये विविध क्रीडा उपक्रम राबवले जात आहेत.

भारताने यापूर्वी पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-२ अशी जिंकली आहे. आता पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेत न्यूझीलंडचा संघ भारत-न्यूझीलंडच्या शंभर वर्षांच्या क्रीडा मैत्रीचे प्रतीक असलेली खास ‘कोटाहितंगा’ लिमिटेड एडिशन जर्सी परिधान करणार आहे. वनडे मालिकेनंतर वेलिंग्टन आणि ख्राइस्टचर्च येथे दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version