घरबिजनेसदिवाळीच्या तोंडावर अमूलचा महागाईचा झटका!

दिवाळीच्या तोंडावर अमूलचा महागाईचा झटका!

तूप आणि बटरच्या किमतीत वाढ

दिवाळीचा सण जवळ येत असतानाच सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. देशातील आघाडीची दुग्धव्यवसाय संस्था असलेल्या अमूलने तूप आणि बटरच्या किमतीत वाढ केली आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, फराळ आणि विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी तूप आणि बटरला मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेली दरवाढ ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लावणारी ठरणार आहे. आधीच खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे घरगुती बजेट कोलमडले असताना अमूलच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे.

अमूलच्या नवीन दरांनुसार, एक किलो तुपाची किंमत ६३० रुपयांवरून ६८० रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच किलोमागे थेट ५० रुपयांची वाढ झाली आहे. तर ५०० ग्रॅम तुपासाठी आता ३४५ रुपये मोजावे लागणार असून, यापूर्वी त्याची किंमत ३२५ रुपये होती. बटरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. १०० ग्रॅम बटरचा पॅक ६३ रुपयांवरून ६६ रुपये, तर ५०० ग्रॅमचा पॅक ३१० रुपयांवरून ३२५ रुपये झाला आहे. त्यामुळे तूप आणि बटरची नियमित खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात डेन्मार्कच्या कंपन्यांची ६०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक

‘चलो दिल्ली’ रॅलीला दांडी मारणारे काँग्रेसचे ८३ पदाधिकारी निलंबित

भारतातील श्रीमंत करदात्यांची संख्या दुप्पट!

अमेरिकन नागरिकांनी युद्धाला नाकारले!

दरम्यान, तुपाच्या वाढत्या मागणीसोबतच बाजारातील पुरवठ्याशी संबंधित अडचणीही या दरवाढीमागे महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. गुजरात आणि राजस्थानमध्ये भेसळयुक्त तुपाविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे ग्राहकांचा विश्वासार्ह ब्रँडच्या उत्पादनांकडे कल वाढला आहे. या दोन राज्यांमध्ये गेल्या सहा महिन्यांत सुमारे दोन लाख किलो बनावट तूप जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, अमूलच्या तुपाची मागणी वाढली असून काही शहरांमध्ये गायीच्या तुपाचा तुटवडाही जाणवत आहे. देशातील वार्षिक तुपाच्या वापरापैकी सुमारे ४५ टक्के वापर सणासुदीच्या काळात होत असल्याने मागणीचा दबाव अधिक वाढला आहे.

विशेष म्हणजे, सप्टेंबर २०२५ मध्ये जीएसटी दर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्यानंतर अमूलने आपल्या ७०० हून अधिक दुग्धजन्य उत्पादनांच्या किमती कमी केल्या होत्या. मात्र, आता तूप आणि बटरच्या दरवाढीमुळे ग्राहकांना पुन्हा महागाईचा सामना करावा लागत आहे. दिवाळीत मिठाई, लाडू, चकली आणि इतर फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे या दरवाढीचा परिणाम केवळ घरगुती ग्राहकांवरच नव्हे, तर मिठाई दुकाने आणि खाद्यपदार्थ व्यवसायांवरही होण्याची शक्यता आहे. यंदाच्या दिवाळीत गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेताना ग्राहकांना अधिक खर्चाचे गणित मांडावे लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version