राजधानी दिल्लीतील जुन्या दिल्लीच्या चावडी बाजार परिसरात गुरुवारी (५ नोव्हेंबर) सकाळी तीन मजली बांधकामाधीन इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चावडी बाजार मेट्रो स्टेशनजवळील गल्ली सितारा येथे सकाळी ९.५० वाजता या दुर्घटनेची माहिती मिळाली. घटनेनंतर अग्निशमन दलाची सहा पथके पाण्याचे टँकर आणि बचाव वाहनांसह घटनास्थळी दाखल झाली.
इमारतीचा मोठा भाग कोसळून लगतच्या इमारतींमधील अरुंद गल्लीत ढिगारा साचला आहे. जुन्या दिल्लीतील गल्ल्या अरुंद असल्याने आणि रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी असल्याने बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बचाव पथकांना काही अंतर पायी चालत जाऊन मदतकार्य करावे लागत आहे. स्थानिक रहिवाशांनी आपली वाहने बाजूला करून रुग्णवाहिकांसाठी मार्ग मोकळा केला.
प्रत्यक्षदर्शी मोहम्मद नईम यांनी सांगितले की, मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर धावले. सुरुवातीला स्वतःचे घर कोसळल्याचा भास झाला. मात्र, तपासल्यानंतर शेजारील बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळल्याचे लक्षात आले. स्थानिकांच्या माहितीनुसार, या इमारतीचे बांधकाम गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरू होते. इमारतीत कोणीही राहत नव्हते. दुर्घटनेच्या वेळी केवळ मजूर उपस्थित होते.
हे ही वाचा:
इंडी आघाडीच्या रॅलीचा व्यापाराला फटका; देशव्यापी ‘धिक्कार दिन’ पाळणार
इराणला तेल निर्यातीत मदत केल्याप्रकरणी भारतीय दाम्पत्यावर निर्बंध
अग्निवीरांचा सेवाकाळ चार वरून सहा वर्षे!
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील ‘एम’ फॅक्टर
दरम्यान, दिल्लीत अलीकडच्या काळात इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ईशान्य दिल्लीतील मिलन गार्डन परिसरातही इमारतीचे स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर ७ ऑक्टोबर रोजी सीमापुरी येथे चार मजली इमारत कोसळून एका मुलासह तिघांचा मृत्यू झाला होता.
